बारामती(प्रतिनिधी): वाढत्या लोकसंख्येनुसार व सातत्यपूर्ण पारंपारिक शेती पद्धतीच्या वापरामुळे दरडोई शेती खालील सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे. १९७१, मध्ये दरडोई शेती खालील सुपीक जमीन २.२८ हेक्टर होती ती आता घटून २०२१ मध्ये ०.१०९७३ हेक्टर एवढी झाली आहे, आणि ही दरवर्षी २९.३२% या गतीने नापीक होत चालली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ओलिता खालील सुपीक शेत जमिनीचा मोठा वाटा हा ऊस शेतीत मोडतो. ऊस शेतीतील भविष्यातील संधी पाहता जसे की “इंधन म्हणून इथेनॉलचा वापर”, इथेनॉल चलीत वाहनांच्या निर्मितीवर नजीकच्या काळात फार भर देण्यात येत आहे व ती काळाची गरज देखील आहे. असे झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अधिक उत्पन्नाची अपेक्षा केली जाईल पण सध्याच्या परिस्थितीनुसार पारंपरिक शेती पद्धती, शेतीमधील योग्य माहितीचा अभाव यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे व उत्पादन घटत चालले आहे. सध्याच्या काळात प्रति एकर उसाचे सरासरी उत्पादन ३५ – ४० टन एवढेच होताना निदर्शनास आले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही व त्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे.
उत्पादन घटण्याची मुख्य कारणे शोधली असता असे निदर्शनास येते की.
वारे माप पाण्याचा अतिवापर, असंतुलित व अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीमधील क्षारता व सामू मध्ये वाढ झाली आहे. यामुळे सेंद्रिय घटकांची कमतरता निर्माण होऊन जमिन नापीक होत आहे. परिणामी शेतीतील आव्हाने वाढतात, जसे की रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो परिणामी उत्पादन खर्च वाढतो व उत्पन्न कमी होते.
यावरच पर्याय म्हणून शरदचंद्रपवार आधुनिक ऊसशेती विस्तार प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्रातील व भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक ऊसशेतीचा प्रयोग ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, तसेच मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर गेल्या ३ वर्षांपासून सहकार्याने संशोधन केले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. कृषी तंत्रज्ञानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरातील सुमारे १००० शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT ), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (GIS), मशीन लर्निंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्या टप्प्यात २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे व उर्वरित ८०० शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्व व सुरु हंगामामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
प्रकल्पाची उद्दिष्टे:-
या प्रकल्पामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणकीय दृष्टिकोन, मशीन लर्निंग आणि IOT या तंत्रज्ञानांचा उपयोग करून ऊस शेतीमधील मुख्य आव्हानांना, जसे कि कमी उत्पादन, वाढलेला उत्पादन खर्च, कीड व रोग नियंत्रण, खत व पाणी व्यवस्थापन आणि कमी साखर उतारा या आव्हानांवर काम करणार आहोत. AI आधारित उपाययोजना वापरून शेतकऱ्यांसाठी उत्पादन शाश्वता वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि यशस्वी निष्कर्ष दाखवून, आम्ही जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत जशी की,
-पाण्याचा अतिरिक्त वापर नियंत्रित करणे.
-गरजेनुसार व हवी तेवढीच रासायनिक खते कशी वापरावीत यावर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन करणे.
-नवनवीन लागवड तंत्रज्ञान लागवडीखाली आणून त्याचे होणारे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे.
-जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर व सामू नियंत्रणावर विविध आधुनिक पद्धतीद्वारे मार्गदर्शन करणे.
-सततच्या वातावरणातील बदलानुसार पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापनव तसेच रोग व कीड व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन करणे.
-आधुनिक सेन्सर्स व सॅटेलाईट प्रणालीचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन करणे.
-२५ ते ३० % उत्पादन खर्च कमी करून ३५ ते ४० % पर्यंत उत्पादनात वाढ कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणे.
प्रकल्पाची कार्यपद्धती :-
१. उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (GIS) – मॅप माय क्रॉप :-
“मॅप माय क्रॉप” हे उपग्रहाच्या सहाय्याने हाय रिझोल्युशन मॅपिंग करून ऊस शेतीचे मूल्यमापन करते.
१) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पीक शोध नकाशा (ऑटोमेटेड क्रॉप डिटेक्शन) :- यामध्ये पिक व पिकाची अचूक जात शोधता येते.
२) रोग व कीड यांच्या संक्रमणाचा अचूक नकाशा :- या नकाशात आपणास आपल्या शेतातील पिकामध्ये आलेल्या रोग व किडींच्या संक्रमणाची योग्य जागा उपग्रहाद्वारे मिळते.
३) पिकावरील असलेला ताण व त्या जागेचा अचूक नकाशा :- या उपग्रह नकाशाद्वारे आपणास आपल्या शेतातील जैविक व अजैविक ताण व त्याची योग्य जागा समजते.
४) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित जमिनीचा ओलावा व तापमान मूल्यमापन :- या उपग्रह प्रणाली द्वारे शेतातील ओलावा व जमिनीचे तापमान ० सेंटीमीटर ते ४८ सेंटीमीटर मधील माहिती समजते.
५) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पिकाचे अन्नद्रव्य ग्रहण मूल्यमापन :- या उपग्रह प्रणाली द्वारे मिळणाऱ्या नकाशात आपणास शेतातील पिकाची अन्नद्रव्य ग्रहण क्षमता समजते.
६) उपग्रह प्रणाली आधारित संपूर्ण माती परीक्षणाचा अहवाल :- या उपग्रह प्रणाली द्वारे नोंदणीकृत शेतातील संपूर्ण माती परीक्षणाचा अहवाल त्यातील सेंद्रिय कर्ब, सामू, विद्युत वाहकता, मूलभूत व दुय्यम अन्नद्रव्यांची अचूक माहिती समजते.
११) उपग्रहाद्वारे पिकातील नत्राच्या पातळीचे मूल्यमापन :- या उपग्रह प्रणाली द्वारे सध्याच्या परिस्थितीतील नोंदणीकृत शेतातील पिकाच्या पानातील नत्राच्या पातळीचा अचूक अंदाज समजतो.
२. सॅटेलाइट इमेजरी – अॅग्री पायलट : –
AgriPilot.ai भारतातील शेती क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणत आहे. एडीटी बारामतीच्या सहकार्याने सुरू केलेला हा ऍग्रीटेक उपक्रम ऊस शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांना – अनियमित हवामान अंदाज, पाणी आणि खतांचा अतिवापर, पिकाच्या गुणवत्तेत घट, आणि तणांमुळे होणारा संसाधनांचा ऱ्हास – या समस्या सोडवण्यासाठी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित आयओटी सेन्सर, रिअल-टाइम सॅटेलाइट हवामान एपीआय, आणि स्थानिक हवामान केंद्रांच्या सहाय्याने AgriPilot.ai शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती आणि सखोल मृदा आरोग्य माहिती देते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विविध लाभ मिळणार आहेत, जसे की उत्पादनात ३५-४० % वाढ, उत्पादन खर्चात २०-४०% घट, ३०% पाण्याची बचत, रासायनिक खतांच्या वापरात २५% घट, कापणी कार्यक्षमतेत ३५% सुधारणा, रोगाच्या निरीक्षणामुळे औषधांच्या वापरात २५% बचत, इ.
३. वेदर स्टेशन – फसल :-
फसल हे कृषी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे, फसल पिक-विज्ञान आणि IoT चा वापर करून शेती-स्तरीय, विशिष्ट पिक आणि पीक वाढ अवस्था याची माहिती पुरवते, ज्यामुळे पाण्याचा, कीटकनाशकांचा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर होतो व शेतातील उत्पादन क्षमता वाढते. फसलची एडीटी बारामती सोबतची भागीदारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे आणि संसाधनांचा वापर करणे यावर लक्ष केंद्रित करते. प्रारंभिक टप्प्यात, २०० हून अधिक शेतकऱ्यांनी फक्त ३ महिन्यांत हे तंत्रज्ञान वापरून दर महिन्याला १-२ सिंचन पाळ्या वाचवल्या. ज्यामुळे प्रति एकर सुमारे ४ – ५ लाख लिटर पाण्याची बचत झाली. शेतकरी आता मायक्रो आणि मॅक्रो हवामान माहिती, तसेच आगामी हवामान अंदाज वापरून आणि पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस (POP) चा वापर करून शेतीचे नियोजन करू शकतात. या तंत्रज्ञानाचा फायदा उच्च नेट प्रमोटर स्कोर (NPS) ६० मध्ये दिसतो, जो शेतीसाठी चांगला स्कोर मानला जातो.
४. कोजल मशीन लर्निंग :-
हे तंत्रज्ञान भविष्याची माहिती देण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा अग्रेसर वापर सादर करेल, ज्यामुळे ऊस शेतीच्या व्यवस्थापनासाठी “काय केल्याने काय होईल” याचे विश्लेषण करता येईल. शेतातील सध्यस्थितीमधील माहिती आणि उपग्रह प्रतिमांचा वापर करून ऊसातील शर्करेचा व उत्पादनाचा ९८% पेक्षा जास्त अचूक अंदाज देईल.
A.I तंत्रज्ञानाचे फायदे :-
ऊस उत्पादन वाढ :- A.I. आणि अचूक उपग्रह नकाशा प्रणाली माहितीच्या सहाय्याने ऊसशेतीच्या उत्पादनात ३५ % ते ४० % पर्यंत वाढ मिळेल.
मातीचे आरोग्य :- A.I. आणि I.O.T उपकरणांच्या माध्यमातून मातीचे निरीक्षण व तपासणी करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यास मदत होईल .
सिंचन कार्यक्षमता :- IOT स्नेन्सर प्रणालीमुळे मातीतील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होईल व पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करता येईल.
कीड व रोगांचे अचूक विश्लेषण :- हवामान अभ्यास प्रणाली मुळे ऊसावरील संभाव्य कीड व रोगांची माहिती मिळेल व त्याचे नियंत्रण योग्य पद्धतीने करता येईल.
सेंद्रीय कर्ब :- सेंद्रिय कर्ब मूल्यमापनाद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा दिला जाईल.
शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा :- वाढलेले उत्पादन आणि साखरेची बचत यामुळे शेतकऱ्यांना प्रती टन २०० रुपयांपर्यंत अधिकचा नफा मिळेल.
शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमता ठरेल गेम चेजर :-
AI ( कृत्रिम बुद्धिमता) प्रकल्पामुळे भारतातील व महाराष्ट्रातील आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
१. भारतातील ऊस उत्पादन व आर्थिक उत्पन्न :-
-भारतातील एकूण ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न :- ₹ ८०,००० कोटी ते ₹ १,००,००० कोटी
-A.I– तांत्रज्ञानच्या वापरामुळे ३० % उत्पादनामध्ये वाढ.
-मिळणारे उत्पन्न :- ₹ १,३० ,००० कोटी
२. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन व आर्थिक उत्पन्न
-महाराष्ट्रात एकूण ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न :- ₹ ३०,००० ते ₹ ३५,००० कोटी
-A.I – तांत्रज्ञानच्या वापरामुळे ३० % उत्पादना मध्ये वाढ.
-मिळणारे उत्पन्न :- ₹ ४५,००० कोटी एवढी वाढ अपेक्षित आहे.
इथेनॉल उत्पादनात वाढ :-
महाराष्ट्रातील साखर कारखाने साखर गाळल्या नंतर उरलेल्या मळीपासून (molasses) इथेनॉल तयार करतात. एक टन ऊसापासून साधारण ८ ते १० लिटर इथेनॉल तयार होते, ज्याची सरासरी किंमत प्रति लिटर ₹ ६० ते ₹ ६५ आहे.
महाराष्ट्रात इथेनॉल उत्पादनातून ही शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना देखील याचा आर्थिक फायदा होईल जसा की, सरासरी उत्पन्नामध्ये ३० % वाढ म्हणजेच एकरी उत्पन्न ६५ टनापासून ९१ टन झाल्यास इथेनॉलचे उत्पादन ९१० लीटर इतके होईल :-
६५ टन ×१० ली. =६५० ली. इथेनॉल आणि ६५० ली. × ₹ ६५ = ₹ ४२२५०/-
९१ टन × १० ली. = ९१० ली. इथेनॉल
९१० × ६५= ₹ ५९१५०/-
म्हणजेच साखर कारखान्यांना एकरी १६९०० इतकी उत्पन्नात वाढ होईल.
आपणास कृषिक मध्ये २०२५ ला काय पाहता येईल……!!!
A.I. तंत्रज्ञान ज्यामध्ये हायपरस्पेक्ट्रल ड्रोन, उपग्रह तंत्रज्ञान, I.O.T. सेन्सर्स, स्वयंचलित हवामान केंद्र, अल्गोरीदम, या विविध तंत्रज्ञानांचा वापर प्रत्यक्ष कृषी क्षेत्रात कसा होतो याचे सादरीकरण व हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेली द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, परदेशी फळपिके, भाजीपाला व ऊस, इ. पिकांची थेट प्रात्यक्षिके पाहता येतील.