बारामती(प्रतिनिधी): काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत बारामती विधानसभा मतदार संघातून विशेषत: बारामतीतून 48 हजारांचे मताधिक्य खा.सुप्रिया सुळेंना होते. याबाबत तर्क काढताना काही जण म्हणतात सहानुभूतीमुळे मताधिक्य वाढले तर काही जण म्हणतात काही अतिउत्साही पदाधिकारी व मलिदागँगच्या पक्षातील लुडबूडीमुळे मताधिक्य वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऐन विधानसभा निवडणूक काळात अजित पवार यांनी पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते व काही पदाधिकार्यां मध्ये मरगळ आल्याचे दिसत आहे. पक्षावर निरिक्षण करण्यासाठी बाहेरून व्यक्ती बोलाविण्यात आला आहे. याने तर कहरच केला म्हणे..तुला हे पद देतो, या पदावर बसवतो, दादांना सांगतो असे म्हणून कित्येक पदाधिकारी व कार्यकर्ते नादवून ठेवलेले आहेत. हे निरिक्षक आहे की परिक्षक हे अद्याप कळाले नाही.

आजमितीस सुद्धा पक्षांतर्गत वाद विकोपाला पोहचलेले आहेत. काल परवाच पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत सूचना मांडणारे व समोर बसणार्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक झाली. यावेळी लहान नेत्यांना तातडीने बोलवावे लागले.
बारामती शहरात गटा-तटाचे राजकारण नवे नव्हे. श्रेयवाद तर विचारूच नका, याबाबत फटका ऐन निवडणूकीत अजित पवार यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांना चांद्यापासून..बांद्यापर्यंत तमाम जनता, मतदार मानतात मात्र, काही स्वत:ला दादा समजणार्या मंडळींमुळे ते दादावर नाराज आहेत.
आयते कोलीत यांच्या हातात दिल्याने हे पदाधिकारी मस्तवाल झालेले आहेत. आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा असे म्हणत आहेत. दादाला आम्ही सांगेल तेच खरे असे म्हणत आहेत. या काही पदाधिकार्यांमुळे रात्रीचा दिवस करून पक्षात काम करणारे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण झालेले आहे. सच्चा कार्यकर्ता आजही दादा..दादा…करूनच ओझे वाहुन मेटाकुटीस आलेला आहे. पदाधिकारी आदेश देत स्वत:चे खिसे भरीत आहेत. या सर्व प्रकारामुळे अजित पवार यांचे मताधिक्य घटल्याशिवाय राहणार नाही.
बुथ कमिटी, बुथ अध्यक्ष व यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला अध्यक्ष यांची ऐन निवडणूकीत चाचपणी घेतल्यास अजित पवार यांचे मताधिक्य वाढवायचे आहे की, घटवायचे हे शेबड्या पोराला कळल्याशिवाय राहणार नाही. कित्येक ठिकाणी अशी माणसं दिले आहेत की, त्यांची अर्धी लाकडं स्मशानभूमीत आहेत. तर काहींना स्वत:च्या घरात किंमत नाही मग त्या प्रभाग, वार्डात किंमत कोण देणार. काही प्रभाग व वार्डात पक्षाच्या उभारणीपासून काम करणारे निष्ठावंत आहेत. त्यांचा विचार कमिट्या नेमताना करणे गरजेचे होते. त्या निष्ठावंतांना डावलून कधीही पक्षाचा झेंडा हातात न घेतलेल्यांना मुकूट घातल्याने नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
बुथ कमिटी, अध्यक्ष निवडताना निवडणूका घेणे अपेक्षित होते. तसे न केल्याने जवळचा, माझ्या ऐकण्यातला, पक्षांतर्गत असलेल्या विरोधकाला उत्तर देणारा वरचढ असे नियुक्त केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गप्प बसून बुक्क्यांचा मारा काही पक्षातील निष्ठावंत सोसत आहेत. आम्ही दादांसाठी काम करणार असेही काही म्हणत आहेत.
बारामती विधानसभा निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर अजित पवार यांनी विकासाची वाटचाल या पुस्तकाचे थोडं वाचन केले कामांचा डोंगर यामधून दिसत आहे. तरी सुद्धा अजित पवार यांना मतदान करा असे म्हणावे लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.
बारामतीत प्रचाराचा नारळ वाढविला की, थेट शेवटच्या सभेला येणार्या अजित पवार यांना बारामतीत तळ ठोकून बसावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रातील मंडळींच्या बैठका घ्याव्या लागत आहेत. अशी परिस्थिती या पदाधिकारी यांच्या गटा-तटाच्या राजकारणामुळे विशेषत: श्रेयवादामुळे झालेली आहे. ही विस्कटलेली घडी पुन्हा बसणे अशक्य आहे. यासाठी निवडणूकीनंतर अजित पवार यांनी या पदाधिकार्यांना दिलेले अधिकार काढून घेतले पाहिजे तर पुढे काही चांगले घडेल अन्यथा घडू नये ते घडेल.