सत्ताधारी पक्षाचा विरोधक म्हणजे आरसा असतो. या आरस्याकडे दुर्लक्ष करून कामे केल्यास सत्ताधारी कुठं ना कुठं अडचणीत येतात हे आतापर्यंतच्या राजकारणावरून दिसून आले आहे. असाच काहीसा प्रकार बारामती शहरात झाला. बारामती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर पक्षाने इमाने इतबारे काम करीत आलेले आहेत. बारामतीच्या विकासातील महत्वाचा घटक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते.
वेळोवेळी पाटसकर प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करीत आलेले आहे हे बारामतीतील शेंबड्या पोराला विचारले तरी तो सांगेल आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. बारामती शहर पोलीस स्टेशनचा कारभार अत्याधुनिक प्रशस्त अशा इमारतीत गेला. शहर पोलीस स्टेशनची जुनी इमारत शहराच्या मध्यभागी होती त्यामुळे गुन्हेगार, छोट्या-मोठ्या चोरांवर एक प्रकारचा दबाव होता. जेव्हापासुन शहर पोलीस स्टेशन शहराच्या मध्यभागातून गेले तसे व्यापारपेठेत गुन्ह्याचे प्रकार वाढले. या बाबीचा व बारामतीकरांचा विचार करीत ऍड.पाटसकर यांनी प्रशासनाला बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा जुन्या पोलीस स्टेशनच्या समोर नगरपरिषदेच्या जागेत पोलीस चौकी होणेबाबत व कुठे करायचे याबाबत जागा दाखवित विनंती निवेदन सादर केले.
निवेदन आल्याचे कळताच बारामतीच्या नेत्यांनी व्यापारी मेळाव्यात व्यापार्यांच्या अध्यक्षांना व्यापार्यांच्या हाकेच्या अंतरावर जुन्या पोलीस स्टेशन जवळ चौकी होणेबाबत अर्ज करण्याचे सांगितले. त्यानुसार कागदी घोडे नाचवित व्यापारी महासंघाने अर्ज सादर केला आणि काय सांगता पत्र पोहचता दुसर्या दिवशी चौकी सुरू झाली त्याचे उद्घाटन सुद्धा झाले. म्हणजे मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर अशी अवस्था बारामतीत झाल्याचे दिसून आहे.
मध्यंतरी याच पक्षाच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या सुळसूळाटामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्याबाबत बारामती नगरपरिषदेत निवेदन देण्यात आले. मग हे निवेदन दिले म्हणून तातडीने नेत्यांनी व्यापारी महासंघ किंवा इतर संघटनेला तुम्ही अर्ज निवेदन सादर करा तातडीने बारामतीतील सर्व कुत्री पकडून त्याचा बंदोबस्त करण्यात येईल असे का सांगितले नाही. असे अनेक विकासात्मक प्रश्र्न ऍड.सुधीर पाटसकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडले आहेत. आतापर्यंत त्यांनी मांडलेल्या प्रश्र्नावर अशाच प्रकारे उत्तरे दिली असती तर नेत्यांचे व प्रशासनाचे आभार तरी नागरिकांनी मनभरून मानले असते.
यापुढे बारामतीत कोणताही प्रश्र्न उपस्थित झाल्यास खरं तर विरोधकांनी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेतली पाहिजे. विरोधकांनी मुलभूत प्रश्र्नाला हात घातला की, कोणाला तरी उभं करायचे आणि त्यात लक्ष घालायला लावून श्रेय ओढवून घ्यायचे असे काहीचे दिसत आहे. श्रेयवाद असावा पण एखाद्याला श्रेय देण्याचे धाडस सुद्धा मनात असले पाहिजे. नुसतं नेत्यांनी भाषणात सांगायचे मी दर शनिवार, रविवार बारामतीत असतो कधीही माझ्याकडे येऊन विकासाबाबत काही अडचणी, त्रुटी असतील त्या मांडाव्यात त्या मार्गी लावण्यात येतील. मात्र, नेत्यांपर्यंत त्या विरोधकांचा किंवा कार्यकर्त्यांचा आवाजच पोहचू देत नसतील तर घोंगडं भिजत ठेवल्यासारखा प्रश्र्न भिजतच राहतो. ज्यावेळी निवेदन/अर्जाचे शस्त्र बाहेर काढल्यानंतर सत्ताधारी खडबडून जागे होतात आणि श्रेय लाटण्यासाठी कोणाला तरी उभं करतात आणि हे काम आम्हीच केले असे सांगून टेरी बडविण्याचे काम केले जाते. मात्र कोंबडं कितीही झाकलं म्हणून सुर्य उगवायचा राहत नाही हे ही तेवढे सत्य आहे.