सत्तेसाठी खा!..घे!..फूकट…

माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आहेत. या पूर्ण करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक माणूस पळत असतो झिजत असतो. जिथं विकसीत शहर होत असते त्याठिकाणी मजुराचा अभाव जाणवतो.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास केला असता खा..फूकट व घे फूकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांना विविध सुविधेबरोबर वैयक्तिक स्वार्थही पाहिजेत. हीच नाळ ओळखून राजकारण्यांनी फूकट वाटण्याचा सपाटाच लावला आहे. शिधा मोफत मिळत आहे तर काही ठिकाणी साड्यांचा पाऊस पडला की काय अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीला साड्या वाटप चालू आहे. लाडकी बहिण योजनेत दरमहा दीड हजार त्या महिलेच्या खात्यात जमा होत असल्याने, मजुर आपण करीत असलेली इमाने इतबारे मजुरी विसरून गेला आहे.

कित्येक शेतकरी मजुर मिळत नसल्याने मेटाकुटीस आलेले आहेत. कुटुंबाच्या उपजिवीकेसाठी शिधा फूकट, दरमहा दीड हजार खात्यात, एस.टी.प्रवास फ्री त्यामुळे राजंदारी करणारे राजंदारी करण्याचे विसरून गेले आहेत. याचा फटका सर्वसामान्य शेतकर्‍यांना बसलेला आहे. शेतकर्‍यांची जिरविण्यासाठी ही योजना केली का? असा प्रश्र्न शेतकर्‍यांना पडलेला आहे.

कामावर मजूर मिळत नाही. खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या आता कदाचित त्याही कमी होतील. ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला हजार रुपये जरी कमावले तरी सर्व खर्च निभावतो कारण धान्य मोफत किंवा कमी किमतीत मिळते. सबसिडीवर सिलेंडर मिळतात. वृद्धांना निराधार चे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहेत. यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली, व्यसनी झाली. ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतेच काम करताना काही लोक दिसतात. कामाला ये म्हटलं तर 5 तासांची मजुरी 500 रुपये सांगतात. ह्या योजनांनी जनतेचे भले व्हायचे असते तर गेल्या पन्नास वर्षातच झाले असते.

सरकार विविध योजनेच्या माध्यमातून फूकट वाटण्याचा सपाटाच लावलेला आहे. सरकार अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण, आरोग्य फूकट का देत नाही. मलमपट्टी करण्यापासुन ते ओपन हार्ट सर्जरीपर्यंत सारखे विविध आजार मोठ-मोठ्या हॉस्पीटलमध्ये फूकट का करीत नाही. कारण शैक्षणिक संस्था व मोठ मोठी हॉस्पीटल हे राजकारणी लोकांचेच आहेत. त्यामुळे हे फूकट करून स्वत:चे घर बसवायचे का? असाही प्रश्र्न आहे. हीच मंडळी छाती ठोकपणे सांगतात, सार्वजनिक शाळा, सार्वजनिक रूग्णालयात फूकट शिक्षण व उपचार होतो. याठिकाणी मिळणारी सेवा व होत नसलेले उपचार या राजकीय मंडळींना दिसत नाही.

या राजकीय मंडळींना चांगले अवगत आहे. शिक्षण व आरोग्याची मोफत सेवा दिली तर आपल्या मागे व आपले उदोउदो करणारी माणसं आपल्याला भेटणार नाही. कारण तो उच्चशिक्षित झाला तर चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल. त्याचा घरखर्च भागेल. मोफत आरोग्य सेवा असल्याने कुठेही जावून तो उपचार करू शकतो. हे फूकट फार काळ चालणारे नाही ज्या राज्यात या फूकटच्या योजना सुरू होत्या त्या बंद झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने इतर राज्याचे अनुकरण केले खरे मात्र ते टिकणार किती हे येणार्‍या काळात पहावयाचे आहे.

सध्याचे पिढीचे सोडा, येणार्‍या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा. फुकटामुळे उज्वल भविष्याची स्वप्ने भंग होत आहेत तरुण पिढी निष्क्रिय बनत आहेत सरकार व समाज व्यवस्थेने याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. सुज्ञ सुजाण नागरिकांनी फुकट मुफ्त या गोष्टींना कडाडून विरोध करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!