बारामती: येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्द जळोची येथील चव्हाण इको पार्क येथील रस्त्यासाठी वेळोवेळी अर्ज, तक्रारी करूनही रस्ता होईना. लोकसभा, विधानसभेला भरभरून मतदान करूनही रस्ता होत नसेल तर आम्ही कुठं कमी पडलो असा प्रश्र्न येथील रहिवाश्यांना पडलेला आहे. म्हणे, बारामतीचा विकास, रस्ते का भकास अशी म्हणण्याची वेळ प्रशासनाने आणली की, नेत्यांनी हेच गुलदस्त्यात राहिले आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारी व पिडीत, शोषितांचे प्रश्र्न योग्य ठिकाणी मांडून त्या विरोधा आवाज उठविणारी भारतीय युवा पँथर संघटनेतर्फे या प्रलंबित प्रश्र्नाबाबत तीव्र आंदोलनाची हाक दिलेली आहे.
बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा याबाबत भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजलेपासून बारामती नगर परिषद समोर संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसे निवेदन संघटनेने मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिलेले आहे.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख शुभम गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष अस्लम शेख, बारामती शहराध्यक्ष निखिलभाई खरात, शहर संघटक समीर खान, सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड इ. उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
सदरचा रस्ता तातडीने व्हावा म्हणून अस्लम शेख यांनी वेळोवेळी तक्रारी अर्ज, निवेदन दिले तरी सुद्धा रस्ता काही झाला नाही. बारामती नगरपरिषदेत वाढीव हद्दीत मुलभूत गरजांसाठी आलेला निधी कुठे गेला. सत्ताधार्यांच्या जवळच्या, पै-पाहुणे, नातेवाईकांचा विकास करण्यामध्ये गेला की काय? असाही प्रश्र्न उद्भवत आहे. वाढीव हद्दीसाठी मंजूर झालेला निधी त्याचठिकाणी दिल्यास तेथील विकास झाल्याशिवाय राहत नाही. मात्र, सदरचा निधी इतरत्र वळविण्यात आल्यास तेथे विकास नाही तर परिसर भकास झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत सदरचा प्रश्र्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे अस्लम शेख यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली.