इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये तरंगवाडी ते इंदापूर पर्यंत बुधवारी (दि.10) सकाळी सहकुटुंब सहभागी होत पायी वारी करणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे गेली 28 वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहकुटुंब पायी चालत सहभागी होत आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे समवेत जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धनदादा पाटील हेही पायी चालत सहभागी होणार आहेत. विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे, वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे, पालखी सोहळ्यामध्ये पायी चालल्याने मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. बावडा येथील पाटील घराण्याला पिढ्यानपिढ्यापासून वारकरी परंपरा आहे. देहूचे संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे घराणे व बावड्याचे पाटील घराणे यांचे अनेक शतकांपासून ऋणानुबंध आहेत. बावडा येथे रत्नाई निवासस्थानी हर्षवर्धन पाटील हे दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना अन्नदान करीत आहेत, तसेच निवासस्थानी पालखी सोहळा प्रमुखांचा व विश्वस्तांचा सन्मान करतात.