एकीकडे शासन पारधी समाजाचा उद्धार करण्यासाठी योजना राबविते : वन व पोलीस विभागाच्या त्रासाने दादा शिंदेचा मृत्यू, आर्थिक नुकसान भरपाईसाठी अजुन किती दिवस संघर्ष करायचा?

सोलापूर(प्रतिनिधी): एकीकडे महाराष्ट्र शासन भूमिहीन पारधी जमातीच्या कुटुंबांना स्वाभिमान/सबळीकरण योजना लागू करते आणि एकीकडे वन विभाग व पोलीस खात्याकडून पारधी समाजावर अन्याय करून राहते घरातून बेघर करून त्यास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास देते. यामध्ये अन्यायग्रस्त दादा शिंदेचा मृत्यू होतो. या झालेल्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी अजुन किती दिवस दादा शिंदेच्या कुटुंबियांना संघर्ष करायचा याबाबत पडलेला खरा प्रश्र्न आहे.

गेली कित्येक वर्ष वन जमिनीत नैसर्गिक पाण्यावर स्वत:ची व कुटुंबियांची उपजिवीका करणार्‍या दादा कांगरू शिंदे याच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या वन विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई तर दूर मात्र, शिंदे कुटुंबियांची झालेली आर्थिक नुकसान भरपाईसाठी कोणतीही कार्यवाही पुढे जाताना दिसत नाही. दि.14 जून 2024 रोजी एकात्मिक अधिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी यांना लेखी अर्जाद्वारे मागण्यांचे निवेदन सुद्धा दिलेले आहे.

एकात्मिक अधिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांनी आतापर्यंत कोणकोणत्या योजनांचा लाभ संबंधित पारधी समाजातील कुटुंबियांना दिला. जागृती मेळावे, रोजगार मेळावे, युवकांसाठी सुशिक्षित बेरोजगार मेळावे, महिला मेळावे घेणे गरजेचे होते. यामधून या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असता आणि अन्याय मुक्त झाला असता.

या दिलेल्या निवेदनात वन विभाग व पोलीसांच्या त्रासाला कंटाळून झालेल्या मृत्यू व त्याच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. ग.नं. 724 महाराष्ट्र शासन वनविभागची जमिन तसेच 431 सरकारी जमिन यामध्ये शिंदे कुटूंबाला यापुर्वी दिलेल्य प्रस्तावाप्रमाणे 7/12 पत्रकी नोंद करुन मिळावी. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी 20 लाखाची आर्थिक मदत तातडीने मिळावी असे म्हटले आहे.

दादा शिंदे यास वनविभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतीही कल्पना न देता कित्येक वर्षापासुन याठिकाणी राहत असलेले दादाचे घर उद्धवस्त केले. याठिकाणी राहायचे नाही वहिवाट करायची नाही अशी धमकी सुद्धा देत होते. सदर जागेत मधुकर कुरकुरया काळे यांचे देखील निधन झाले होते त्याचे प्रेत याचठिकाणी दफन केलेले आहे.

सदर गावात वनहक्क समिती सुद्धा स्थापन झालेली आहे. याठिकाणचे असलेले अतिक्रमण ई-उतारा तलाठी यांची नोंद देखील झालेली आहे. सदरील समितीने आमचे घराचे अतिक्रमण असल्याची नोंद सुद्धा केलेली आहे. एवढं असताना सुद्धा सततच्या त्रासामुळे दादाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दादा समाजात काम करीत असताना सामाजिक भान जपत भिक्षा मागणीचे काम करीत होते. त्यांनी निर्भिडपणे पोलीस मित्र म्हणून चांगल्याप्रकारे काम सुद्धा केलेले आहे याची नोंद सुद्धा पोलीस दप्तरी असेल. पोलीसांना खबर्‍या देतो म्हणून, दादाचा आवाज दाबण्यासाठी काही लोकांनी व पोलीसांनी मिळून दादावर खोटा, लबाडीचा चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा व वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेल्या नुकसानीचा मानसिक धक्का बसून त्यास हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यात दादा शिंदे मृत्यू झाले.

दादा शिंदे यांच्या पश्र्चात पत्नी बयती व मुलगी स्वाती असे कुटुंब आहे. आठ कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारा गेल्याने सर्व कुटुंब धर्मसंकटात सापडलेले आहेत. सध्या दादाची पत्नी बयती हिच्यावर सर्व जबाबदारी येऊन ठेपली आहे. या सर्व प्रकाराबाबत झालेल्या अन्यायाबाबत कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे मयतीची नोंद आहे व फेरजबाब सुद्धा घेतल्याची नोंद आहे. (नं.43/24 सीआरपीसी 174 प्रमाणे दा.ता.21/05/2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!