बारामती (ऑनलाईन वृत्त): डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी थाटामाटात करून, पाच लाभार्थी महिलांच्या हाती घराच्या चाव्या देण्यात आल्या. लोकसभा निवडणूकीनंतर उर्वरीत लोकांना चाव्या दिल्या जातील असे सांगत आज तगायत लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळाला नसल्याने निलेश मारूती शेंडगे यांचे दोन मागण्यांसाठी मुंबई आझाद मैदानावर दि.2 जुलै 2024 पासून उपोषण सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, बारामतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या जागेवर पडलेले आरक्षण उठवून त्याच ठिकाणी भव्य-दिव्य अशी पुन्हा वसाहत उभारली आहे. सदर वसाहतीचे काम पूर्णत्वाकडे गेलेले असताना सुद्धा त्याचा ताबा लाभार्थ्यांना दिला जात नसल्याची व बोगस घरपट्टी विरोधात कारवाई करण्यात यावी अशा दोन तक्रारीबाबत निलेश शेंडगे यांनी उपोषण केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत उभारण्यासाठी येथील 96 कुटुंबियांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले होते. आज सात ते आठ वर्ष झाले लाभार्थ्यांची होत असलेली हेळसांड प्रशासनाला दिसत नसेल तर खूप खेदाची बाब असल्याचेही शेंडगे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीच्या पुर्वी तातडीने सदरील वसाहतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले. पाच महिलांना चाव्या देण्यात आल्या, उर्वरीत लाभार्थ्यांना निवडणूकी नंतर चाव्या दिल्या जातील असे आश्र्वासन देण्यात आले. आज निवडणूक होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात आला नाही. लोकसभा निवडणूकीत लाभार्थ्यांना गाजर दाखविले असल्याचेही निलेश शेंडगे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
वसाहतीचे काम अपूर्ण असल्याचे सांगून घराचा ताबा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही शेंडगे यांनी सांगितले आहे.