राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले – हर्षवर्धन पाटील

प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतापराव भोसले उर्फ भाऊंचा सहवास म्हणजे सकारात्मक विचार व माहितीचा प्रचंड खजिना असे. भाऊंबरोबर गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अनेक कार्यक्रमांना एकत्र येण्याचा योग मला आला. भुईंजचे भोसले घराणे व बावड्याचे पाटील घराणे यांचा स्नेह, मैत्री सन 1967 पासून आजही कायम आहे. माझे काका शंकररावजी पाटील व प्रतापराव भोसले या दोन भाऊंनी राज्य विधिमंडळात तसेच लोकसभेमध्ये सहकारी म्हणून काम केले. संसदेमध्ये भाऊंनी सेंट्रल हॉलमध्ये खासदारांना एकत्र येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्र कट्टा सुरू केला, त्या कट्ट्याची चर्चा त्यावेळी देशभर झाली. या कट्ट्याचे माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक लोकहिताचे प्रश्न मार्गी लागले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर लोकहितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आखून त्या यशस्वीपणे राबविल्या.

राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास व इतर खात्यांचे मंत्री म्हणून काम करीत असताना भाऊंनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयामुळे आज महाराष्ट्राचा विकास, प्रगती झालेली दिसून दिसत आहे. भाऊ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणाचा इतिहास हा प्रतापराव बाबुराव भोसले या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

खंडाळा सहकारी साखर कारखान्याची नोंदणी होऊन 20 वर्षे झाली होती, तरी साखर कारखाना उभा राहत नव्हता. केवळ भाऊंच्या आग्रहातर मी सहकार मंत्री असताना सदरच्या कारखान्याला विशेष बाब म्हणून परवानगी दिली व तो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा उभा राहिला. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भाऊंचा मोलाचा वाटा राहिला आहे.

भाऊंची एक बाब माझ्या विशेष स्मरणात राहिली आहे, ती म्हणजे ते फोनची डायरी जवळ बाळगत नव्हते. त्यावेळी लँडलाईनचे फोन होते. एखाद्याला फोन लावण्यासाठी ते डायरी न वापरता तोंडपाठ असलेले फोन नंबर सांगत. त्यांच्या या प्रचंड स्मरणशक्तीचे अनेकांना कौतुक वाटत असे, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केली. भाऊंनी राज्यामध्ये अनेक दशके राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रामध्ये केलेले कार्य, त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांचे चिरंजीव माजी आमदार मदनराव भोसले व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने द्यावी, अशी प्रार्थनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!