बारामती(प्रतिनिधी): अवैध धंदे आढळल्यास ठाणेप्रमुखावर कारवाई करणार असा आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेला असताना त्या आदेशाला बारामतीत केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसत आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सामान्य माणसाला न्याय मिळावा. गुन्हेगाराला कायद्याचे भय असावे. कायदा पाळणार्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आहेत. पोलीस आपले मित्र असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात रूजविण्याचा प्रयत्न राहील असेही पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
बारामतीत मात्र, अवैध धंद्यांचा सुळसूळाट सुरू आहे. पुन्हा एकदा या अवैध धंद्यांनी चांगलंच डोकं वर काढलेले दिसत आहेत. पोलीस अधिक्षकांचे आदेश फक्त कागदावरच राहिले आहेत का? असा समज नागरीकांमध्ये झालेला दिसत आहे.
मध्यंतरी पत्रकार पोलीस झालेल्या चर्चेत पत्रकारांनी सदर ज्या जागेत अवैध धंदे सुरू आहेत किंवा यापुर्वी पोलीसांनी ठोस कारवाई करूनही त्याठिकाणी त्याच जोमाने अवैध धंदे सुरू आहेत त्याठिकाणची जागा, खोली जप्त करावी म्हणजे अशा अवैध धंदे करणार्यांना कोणी घर, गाळा किंवा मोकळी जागा उपलब्ध करून देणार नाही.
भाडेतत्वाचा जो करार केला जातो त्यामध्ये 11 महिन्यांचा करार असतो त्यामध्ये आवर्जुन उल्लेख केलेला असतो की, सदर जागेत कोणताही अवैध व्यवसाय करणार नाही. मात्र, असेही काही दिसत नाही. बारामती नगरपरिषदेने सुद्धा अशा जागा, घरे याबाबत माहिती घेऊन पोलीस व नगरपरिषद मिळून संयुक्तीत ठोस कारवाई करावी व बारामतीकरांना दिलासा द्यावा.
बारामतीत तसे काही होताना दिसत नाही. उलट अवैध धंदे करणारे कोणालाही भित नाही. कायद्यामध्ये असणार्या तरतुदीमुळे अवैध धंदे करणारे भयमुक्त झालेले दिसत आहेत. कायदा खिशात घेऊन फिरताना दिसत आहेत. दोन कारवाईच्या वर कारवाई झाल्यानंतर त्याच्यावर मुंबई पोलीस ऍक्टनुसार पुढची प्रतिबंधक कारवाई केली जाते मात्र तसे काही होताना दिसत नाही त्यामुळे तेरी भी चुप मेरी भी चूप असे सुरू असताना दिसत आहे.