कर्तव्य हेच देव आहे कर्मच पूजा आहे. किंचीत कर्म देखील प्रभूंच्या चरणात टाकलेले फुलासमान आहे.
शिका व संघर्ष करा.
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
संत सत्यसाईबाबा, विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अमूल्य विचार घेत माजी उपनगराध्यक्ष बिरजू भाऊसाहेब मांढरे हे सामाजिक भान जपणारे आहेत. त्यांच्या 16 मे वाढदिवसानिमित्त थोडसं….
बारामती शहरातील 96 खोल्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत इथपासून सामाजिक, राजकीय प्रवासाला बिरजू मांढरे यांनी सुरूवात केली. बिरजू मांढरे यांचे वडिल कै.भाऊसाहेब मांढरे यांनी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या माध्यमातून समाजाची मूठ बांधून ठेवली होती. आई शोभाताई भाऊसाहेब मांढरे या माजी नगरसेविका होत्या. त्या सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. या दोघांच्या सहवासात व उच्च संस्कारात वाढलेले बिरजू मांढरे आहेत.
बिरजू मांढरे यांनी युवा उद्योजक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ज्या गल्लीत, वसाहतीत व विशेषत: ज्या समाजात आपण वाढलो त्यामध्ये त्यांनी कधीही दुरावा निर्माण केला नाही. समाजावर कित्येक संकटे आली व काहींनी आणली तरीही बिरजू मांढरे कधीही मागे हटले नाही. खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे राहिले. यामधून सामाजिक बांधिलकीचे धडे त्यांच्याकडून शिकावे तेवढे कमी आहे.
ज्या वसाहतीत बिरजू मांढरे यांच्या कुटुंबियांनी जीवन व्यथित केले त्या वसाहतीवर आरक्षण पडले. सध्या आरक्षण पडणे म्हणजे, बॉम्ब पडल्यासारखे आहे कधी फुटेल व सर्वकाही होत्याचे नव्हते होईल अशाप्रकारे झाले होते. अशात त्यांनी स्वत:चा व समाजाचा संयम ढळू दिला नाही. समाजाला धीर देत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पडलेले आरक्षण उठविण्यासाठी प्रयत्न केला. ज्येष्ठ नगरसेवक व अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून गणले जाणारे किरण गुजर यांच्यावर गाढा विश्र्वास ठेवत त्यांनी समाजाचा विचार करीत सदरचे आरक्षण उठवून आणण्याचा बिरजू मांढरे यांना शब्द दिला. त्यानुसार आरक्षण उठविण्याचे काम सुरू झाले. म्हणतात ना निंदणाचं घर असावे शेजारी त्याप्रमाणे विरोधकांनी आवाज उठवायला सुरूवात केली. समाज तळ्यात की मळ्यात करू लागला. अशा परिस्थितीत समाजाला विश्र्वासात घेऊन समाजाला तोल सावरण्याचे काम बिरजू मांढरे यांनी केले. बघता..बघता सदरचे आरक्षण उठले आणि अजित पवार व किरण गुजर यांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त होऊन त्याच ठिकाणी वसाहत उभारण्याचा जो शब्द दिला होता तो पूर्ण झाला.
ज्या लोकांनी समाजाची मान खाली जाईल असे कृत्य केले त्यांनाच आज मान उंच करून सदरची इमारत पहावी लागत आहे हे त्रीवार सत्य आहे.
आहे त्याच ठिकाणी वसाहत उभारणार असल्याने येथील 96 खोल्यांमध्ये राहणार्या कुटुंबाचे तात्पुरत्या स्वरूपात पुर्नवसन जळोची हद्दीत करण्यात आले. त्याठिकाणी सुद्धा विरोधकांनी बोंबा मारण्यास कमी केले नाही. समाज बिरजू मांढरे यांच्यावर विश्र्वास ठेवत तग धरून होता. समाजाने जो संघर्ष केला त्यास मुर्तरूप प्राप्त झाले आहे. कामाच्या अपूर्णतेमुळे नविन जागेत स्थलांतर करण्यात आले नाही. एखादे काम राहिले तर ते राहावयास गेल्यावर होणार नाही त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर त्यांच्या हक्काचे घर दिले जाणार असल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले आहे. मात्र, काही मंडळी परचा कावळा करीत आहेत.
गेल्या दोन वर्षापुर्वी वादळी पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेल्या पत्राशेडची दुरावस्था झाली. लोकांच्या घरात पाणी शिरले. दयनिय अवस्था झाली होती. अशात किरण गुजर, नटराज टिम व बिरजू मांढरे यांनी या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात चांगल्या ठिकाणी नेऊन त्यांची अन्न, वस्त्र व निवार्याची सोय केली त्यांना मात्र अशा परिस्थितीत उघड्यावर सोडले नाही. फोटो सेशन न करता गोर-गरीबांसाठी असणारी आस्था काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. जोपर्यंत वसाहतीतील घरे ताब्यात मिळत नाही तोपर्यंत त्यांनी कित्येक गोष्टींचा त्याग केलेला आहे ते न सांगणेच बरे. एवढा विचार जर आपल्या समाजाचा करणारे बिरजू मांढरे असतील तर असे व्यक्तीमत्व मिळणे अशक्य आहे.
वसाहत परिसरातील नागरीक व्यसनमुक्त व्हावे म्हणून बिरजू मांढरे व त्यांच्या मित्र परिवारांनी चांगलीच युक्ती लढविली. जो व्यसन करेल त्या स्थानिक महिलांनी मिळून चोप द्यायचा यामुळे कित्येक तरूण व्यसनमुक्त झाले आहेत.
साईच्छा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून साई पायी पालखी सोहळा सुरू केला त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिरजू मांढरे यांनी सामाजिक कामाबरोबर धार्मिक क्षेत्रात सुद्धा भरीव असे योगदान दिले आहे. स्वत: पालखीत पायी चालून साईबाबांचे विचार रूजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. साईबाबांचा जो रथ केला आहे यामधून त्यांचे साईबाबांवर असणारे प्रेम, श्रद्धा दिसून येते.
बिरजू मांढरे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी त्यांना नगरसेवक केले उपनगराध्यक्ष पदाची धुरा हाती दिली. यामाध्यमातून त्यांनी समाजाचा उद्धार केला. आज मोठ्या डौलाने त्याच ठिकाणी आरक्षण उठवून भव्य-दिव्य इमारत उभी आहे.
बिरजू मांढरे ज्या समाजातून पुढे आले त्यांनी तो समाज कधीही विसरला नाही हे खूप महत्वाचे आहे. आज समाजात आपण पाहतो जो उच्च शिखरावर जातो तो समाजाला पाठ दाखविल्याशिवाय राहत नाही. आजही समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना वैद्यकीय मदत, आर्थिक मदत करण्यामध्ये बिरजू मांढरे मागे पुढे पाहत नाहीत.
बारामती शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत म्हणजे दुर्लक्षित भाग होता. याठिकाणी हातावरचे पोट असणारे कुटुंब वास्तव्यास आहे. ज्याप्रमाणे मोठ्या बंगल्यात राहणार्याला मतदानाचा हक्क आहे त्याप्रमाणे याठिकाणी राहणार्याला सुद्धा तेवढाच हक्क आहे हे जाणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, किरण गुजर आणि बिरजु मांढरे यांच्या पाठपुराव्यामुळे या लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले हे त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.
समाजाची हळहळ व्यक्त करणारा नेता प्रत्येक समाजात निर्माण झाल्यास सामाजिक भान जपणे सोयीस्कर होईल. समाजासाठी लढणारा लढवय्या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
संपादक : तैनुर शेख