तोंडावर वहिनी तर मनात ताई…

बारामती लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत पहावयास मिळत आहे. एकनिष्ठेने एका छताखाली, एका इशार्‍यावर व एका दमात काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत, खुन्नस देत आहेत. सोशल मिडीया सध्या आरोप प्रत्यारोपाने भरभरून वाहत आहेत. तर काही मंडळी या वाहत्या गंगेत हाथ धुण्यास मागे पुढे बघत नाही हे ही तितकेच खरे आहे.

काही मतदारांच्या मते फक्त बारामती शहराचा विकास म्हणजे संपूर्ण बारामती तालुक्याचा विकास नव्हे! तर इतर लोकसभा मतदार संघातील मंडळी म्हणतात फक्त बारामती तालुक्याचा विकास म्हणजे संपूर्ण लोकसभेचा विकास नव्हे. सुप्रिया सुळे तर आमच्याकडे कधी फिरकल्या सुद्धा नाहीत. त्यांचा निधीतर कधी दिसलाच नाही उलट अजित पवारांनीच राज्याचा निधी सर्वत्र देण्याचे काम केले. अबकी बार 400 पार असा नारा सध्या महायुतीकडून केला जात आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निवडून गेले किंवा नाही गेले तरी काही एक फरक पडणार नाही. मात्र, सुप्रिया सुळे निवडून नाही गेल्या तर संसदेत बोलणार कोण? कारण सत्ताधार्‍यांचा खरा आरसा विरोधक असतो. त्यामुळे सुप्रिया सुळे काही केलं तरी निवडून गेलीच पाहिजे.

बारामतीचा विकास झाला म्हणून आरोही ठोकली जाते. मग बारामतीत एक गुंठ्यांचा अधिकृत खरेदीखत का होत नाही. गोर-गरीबांना त्यांच्या हक्काची बैठी घरे का मिळत नाही. इतर तालुक्यात गुंठेवारी सुरू असताना बारामतीत बंद का? असाही काही मतदार प्रश्र्न उपस्थित करीत आहेत. बारामती शहरातून निरा-डावा कालवा गेलेला आहे. त्याचे अस्तरीकरण करण्यात आले हजारो कोटीचा खर्च करण्यात आला. मात्र, या कालव्याच्या शेजारील बोअरवेल, विहीरींना पाणी नाही. बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून मोठ-मोठी साठवण तलाव बांधण्यात आले. याचे पाणी व विशेषत: पाणीपट्टी न परवडणारी आहे त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण कोणासाठी?

बारामती नगरपरिषद कित्येक वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एक हाती असताना सुद्धा घरपट्टीची आकारणी भरमसाठ करून ठेवलेली आहे. नव्याने स्थापन झालेल्या उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून समजल्या जाणार्‍या खडकवासला, पुणे इ. ठिकाणी नगरपरिषदेचे काही कर माफ बारामतीत मात्र, खरडून घेतले जाते असं का? हे सर्व दोघे एकत्र असताना होत होते.

याबाबत खा.सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता, आमचं ठरलं होतं की केंद्रात आम्ही पाहायचे राज्याचे दादाने त्यामुळे जास्तीचे लक्ष कधीच दिले नाही. मात्र, जेव्हा वेगळं झाले त्यावेळी विविध प्रश्र्न आ-वासुन पुढे आले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मतदारांना आश्र्वासन दिले. बारामती लोकसभा मतदार संघात यापुढे होणार्‍या प्रत्येक निवडणूकीत विरोध केला जाईल असेही संागण्यात आले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील तालुक्यात आज तेथील स्थानिक नेते जरी उमेदवाराचा प्रचार काही ना काही स्वार्थासाठी करीत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूकीत एकाच पक्षाचे नेते लंगोट बांधून मैदानात उतरताना दिसणार आहेत. त्यावेळी लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी कोणती किती कष्ट घेतले हे पाहुनच उमेदवारी दिली जाणार असे तरी सध्या दिसत आहे.

बारामती शहरातील मतदार काही प्रमाणात सुनेत्रावहिनी यांच्याकडे झुकतील मात्र, इतर ठिकाणी वेगळी भूमिका पहावयास मिळणार आहे. गावागावात, वाडीवस्त्यांवर निवडणूकीचा मुद्दा छेडला असता, नाक तोंड मुरडत काही लोकं प्रतिक्रीया देताना दिसत आहेत. काहींना एकतर्फी बोलता येत नाही तर ते थेट नेत्यांना फोन करून सांगत आहेत आमच्याकडे येऊ नका आम्हाला जे काही करायचे ते आम्ही करू असे म्हणून दुरून डोंगर साजरे अशी भूमिका घेत आहेत. आमच्या तोंडावर जरी वहिनी असले तर मनात मात्र ताई आहे असेही काही मतदार बोलताना दिसत आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघ संघर्षमय, अतितटीचा ठरणार आहे. कोणी आम्हाला सांगू नये कोणाला मत द्यायचे आम्हाला जे काही करायचे ते आम्ही करू असे ठामपणे मतदार बोलताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!