बारामती(प्रतिनिधी): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बन्सवाडा भागात प्रचारसभेत मुस्लिम विरोधी केलेल्या वक्तव्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघातील तमाम मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही काही मुस्लिम समाजातील कार्यकर्ता व पदाधिकारी करतोय प्रचार व पत्रक वाटताना दिसत आहे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
काही साध्य करून घेण्यासाठी समोरच्याशी गोड बोललं पाहिजे ही वृत्ती राजकीय लोकांची असते. मात्र, देशाचे पंतप्रधान जर मनातील वाक्य तोंडावर आणुन सामाजिक लोकशाहीचा पाया असणार्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा अनादर करीत असतील तर यांच्याकडून काय बोध घ्यावा असेही बोलले जात आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
आधीचं जे सरकार (यूपीएचं सरकार) होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे सर्वसामान्यांची संपत्ती गोळा करून कोणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, तुम्हाला हे मान्य आहे का?
नरेंद्र मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, कॉंग्रेसचा जाहीरनामाच सांगतोय की ते देशातील महिलांकडील सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही त्यांच्या गळ्यात ठेवणार नाही.
या वक्तव्यावरून हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण होईल असे बोलून घटनेची पायमल्ली केलेली आहे. तरी सुद्धा निवडणूक आयोग व कायदा सुव्यवस्था राखणारे मुग गिळून गप्प बसलेले आहेत. एखाद्या गल्ली बोळात हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्यास त्या बोलणार्यावर कारवाई केली जाते मात्र, देशाचे पंतप्रधानांना कायदा वेगळा आहे, राज्यघटना वेगळी आहे का? असाही प्रश्र्न उपस्थित केला जात आहे.
कॉंग्रेसचे नेते पी.चिदंबरण यांनी पंतप्रधान मोदींना खुले आवाहन करीत आम्ही लोकांच्या जमिनी, सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू मुसलमानांमध्ये वाटून टाकू असं कॉंग्रेसने कधी आणि कुठे म्हटलं होतं?
लोकांच्या मालमत्तेचं, स्त्रियांकडे असलेलं सोनं, आदिवासी कुटुंबांकडे असलेल्या चांदीचं मूल्य जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं जाईल असं कॉंग्रेसने कुठे आणि कधी म्हटलं?
सरकारी कर्मचार्यांच्या जमिनी आणि त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम वाटून टाकली जाईल, असं कॉंग्रेसने कुठे आणि कधी म्हटलं? असे प्रश्र्न विचारून मोदी किती खोटं बोलतात हे मतदारांसमोर ठेवले आहे.
अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर खुप प्रेम मात्र….
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व सौ.सुनेत्रा पवार यांच्यावर बारामतीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे खुप प्रेम आहे. मात्र..निवडणूक काळात सुद्धा अजित पवार ज्या पक्षाची दोरी धरून वर चालले आहेत त्या पक्षाचे नेते तथा देशाचे पंतप्रधान जर निवडणूक काळात सुद्धा मुस्लिम समाजावर आरोप करीत असतील राज्यघटनेतील मूल्यांचा अवमान करीत असतील तर मुस्लिम समाजच काय इतर समाज सुद्धा पाठीशी राहणार नाही.