बारामती(प्रतिनिधी): रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा राम नवमी बुधवार 17 एप्रिल 2024 रोजी आहे. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणार्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 वाजता झाला. श्री राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, राम नवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे. हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो.
या अनुषंगाने श्रीराम मंदिर, श्रीरामनगर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड राम नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिरात हा सोहळा दरवर्षी गुडीपाडव्याला सुरु होऊन रामनवमीच्या दुसर्या दिवशी पर्यंत चालतो. गेली 12 वर्ष अखंडित सप्ताह साजरा करीत आले असल्याचे पांडूरंग तावरे, ऍड.हरिष तावरे यांनी सांगितले आहे. यंदाचे 13 वर्ष आहे.
ह.भ.प.बाबर महाराज यांचे सांगित रामायण, कीर्तन काकड आरती, हरीपाठ, भजन, श्रीराम विजय ग्रंथाचे वाचन इ. असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे. श्री राम जन्माचे कीर्तन ह.भ.प.महाराज मेहुणकर यांचे आणि काल्याचे कीर्तन ह.भ.प.बापूसाहेब मोरे देहूकर यांचे होणार असल्याची माहिती ऋषिकेश तावरे यांनी दिली.
श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले, तरी त्यांचे आयुष्य परीश्रमयुक्त असेच होते. मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले. राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. राम नवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते, असे मानले जाते. रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्री रामाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. भक्तांच्या जीवनातून सर्व संकटे दूर होतात. या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामासोबत आदिशक्तीचाही आशीर्वाद प्राप्त होतो.
रामनवमीला गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि गुरु योग या पाच योगांच्या संयोगात श्रीरामाची आराधना केल्याने संकटांपासून मुक्ती मिळून संततीसुख प्राप्त होऊ शकते.