बारामतीची लढाई शरद पवार विरोधात अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नसून ती नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): बारामती लोकसभा मतदार संघातील लढाई शरद पवार विरोधात अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नसून ती नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थक भाजप पदाधिकार्‍यांची नाराजी सातत्याने व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा इंदापूर येथे (दि.5 एप्रिल) शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आतापर्यंत संघर्ष होता. काही ठिकाणी तर टोकाची भूमिका घ्यावी लागली होती. युती करणे नेत्यांसाठी सोपे तर कार्यकर्त्यांसाठी खुप अवघड असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांना बरोबर घेऊन काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्याचे मी पालकत्व स्वीकारले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

याप्रसंगी आमदार राहुल कुल, वासुदेव काळे, अंकिता पाटील, चंद्रराव तावरे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, ऍड.कृष्णाजी यादव, मारुतराव वणवे, ज्ञानेश्वर चवरे, अतुल तेरखेडकर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने विरोध केला. काश्मीरमधील कलम हटविण्यासही सुळे यांचा विरोध असल्याचा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला. मोठ्या ध्येयासाठी काम करायचे आहे. जे झाले ते विसरून महायुतीसाठी काम करायचे असून, मोदींसोबत संसदेत बारामतीचा खासदार हवा आहे. कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकले असून, सभेच्या माध्यमातून कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना विश्वास देण्यासाठी मी आलो आहे.

येत्या काळामध्ये इंदापूर-दौंडच्या विकासाला मदत केली जाईल. तसेच मुळशी धरणाचे पाणीही इंदापूर तालुक्याला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

इंदापूरचा कार्यकर्ता स्वाभिमानी विचारांचा आहे. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये खालच्या पातळीवरचे राजकारण होत आहे. खोटे गुन्हे, खटले दाखल केले जात आहेत. कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, अशी तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी बारामतीमधील महायुतीच्या उमेदवाराचे काम केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

इंदापूर येथील सोनाई दूध डेअरीचे संचालक प्रवीण माने यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात माने काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. फडणवीस आणि माने यांच्यातील भेटीचा नेमका तपशील पुढे आला नाही. मात्र, माने जुने मित्र आहेत. ते सातत्याने माझ्याकडे येत असतात. इंदापूरला येऊनही त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी येत नाही, असे ते म्हणाले होते. त्यामुळे इंदापूरच्या पुढील भेटीत चहा पिण्यासाठी येईल, असे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार मी भेट घेतली. ते जुने मित्र आहेत आणि आमच्याबरोबरच आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे चर्चाही सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!