येत्या आठवड्यात आरटीई विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार : प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी

पुणे : येत्या आठवड्यात आरटीई विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) केलेल्या बदलांमुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत.

राज्यभरातील 75 हजार 856 शाळांमधील 9 लाख 71 हजार 203 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईमध्ये केलेल्या बदलांनंतर आता आरटीई प्रवेशांना पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आरटीईअंतर्गत वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखी जागांवर प्रवेश दिले जातात. खासगी शाळांतील प्रवेशांसाठी शिक्षण विभागाकडून शाळांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येत होती. मात्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले.

शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. या बदलावर शिक्षण क्षेत्रातून, पालक संघटनांकडून बरीच टीका झाली होती. या बदलांनंतर शाळा नोंदणी सुरू करण्यात आली. आरटीई संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यात 75 हजार 856 शाळांमध्ये 9 लाख 71 हजार 203 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र अद्याप विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दरवर्षी डिसेंबर- जानेवारीत सुरू होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया मार्च संपत आला तरीदेखील सुरू झालेली नाही. आरटीई प्रवेशातील नवीन बदलानुसार सध्या खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. त्यानंतर आता सर्व शाळांमधील अंतर (मॅपिंग) नेमके किती आहे, याचे ऑनलाइन मोजमाप होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!