बारामती: फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी साजरी केली जाते. धुलिवंदनानंतर वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. उन्हाचा तापता पारा त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असते अशात अंगाची दाह शांत होण्यासाठी रंग उधळले जातात. रंगाचे पाणी अंगावर उडवले जाते.
नैसर्गिक रंगाविषयी वारंवार जनजागृती होऊनही आजही बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग उपलब्ध होत नाही. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरूनहा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते. मात्र, नैसर्गिक रंग सहजरीत्या उपलब्ध झाले पाहिजे अशीही मानसिकता लोकांमध्ये असते.
सध्या उपलब्ध असणार्या रंगांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. जे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. यामुळे त्वचेला खाज सुटणे, जळजळ आणि कोरडेपणा तर होतोच पण डोळ्यांमध्ये जळजळ देखील होते.
दरवर्षी पत्रकारांना रंगपचमीला नैसर्गिक कलर वापराबाबत समाजात जनजागृती करा व बाजारात रासायनिक कलर जे विक्री करतात त्यांच्यावर पोलीसांना सांगून कारवाई करावी असे माजी नगरसेवक निलेशआप्पा इंगुले आठवण करून देण्यासाठी कधीही विसरत नाही. बाजारात घातक रासायनिक रंगाचा वापर केला जातो. प्लॅस्टीकच्या पाण्याचे फुगे, सिल्व्हर कलर तर सर्रासपणे विक्री केला जातो. हे सर्व रंग विषारी असून त्यामुळे त्वचेला खाज सुटून त्यावर पुरळ उठतात. हे रंग ऍलर्जिक असून त्यामुळे केस गळणे, अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे तज्ञांचे मत आहे.
रक्तचंदनापासून लाल रंग, बेसनपीठ व हळदीमिक्स करून पिवळा रंग, पालक-कोथिंबीर, कडुलिंबाची पाने मिक्स करून हिरवा रंग, बीट किसून गुलाबी रंग, झेंडूची किंवा पांगिर्याच्या फुलपासून केशरी रंग, आवळ्याची पावडर लोखंडी भांड्यात भिजत घालून त्यापासून काळा रंग, चहा आणि कॉफी पावडर समप्रमाणात एकत्र करून गरम पाण्यात उकळल्यानंतर चॉकलेटी रंग होतो तर निळ्या जास्वंदापासून किंवा नीलमोहोरापासून निळा रंग असे नैसर्गिक रंग तयार करू शकता.
आपल्या आजूबाजूला विविध शोभेची फुले असतात. या फुलांच्या पाकळ्या सुकवून किंवा पाण्यात उकळवून त्यापासून आणखी काही रंग तयार करता येतात का, असा प्रयोगही करता येईल.
नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगाची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. रासायनिक रंग म्हणजे धातू ऑक्सिडाईज करून किंवा औद्योगिक वापराचे रंग कमी प्रतीच्या तेलात मिसळून तयार केले असतात.
प्रशासनाने दक्ष राहुन अशा रासायनिक रंगांची विक्री करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. रंगामुळे सणाचा सांस्कृतिक ठेवेचा भंग होऊ नये. रंग विक्री करणार्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एक फेरफटका मारल्यास रासायनिक रंगाची वरचढ दिसल्याशिवाय राहणार नाही.