बारामती(वार्ताहर): दि.21 मार्च 2024 रोजीच्या सा.वतन की लकीरच्या वृत्तपत्रात पवित्र रमजान व पवित्र ठिकाणी अवैध धंदा सुरू असलेबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार नव्याने पदभार स्विकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी धाड टाकून अवैध मटका मालक मन्सुर सिकंदर शेख (रा.मुजावरवाडा, पानगल्ली बारामती) यांच्यासह इतर 15 व्यक्तींवर बारामती शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून 1 लाख 82 हजार 680 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.21 मार्च 2024 रोजी 19 वा.सुमारास बारामती शहरातील मुजारवाडा पानगल्ली बारामती येथे पत्र्याच्या खोलीमध्ये कल्याण मटका आकडे लावण्याकरीता आलेले व जुगारीची साधने मिळून आली आहेत. या खोलीमध्ये मटका मालक मन्सुर सिकंदर शेख (रा.मुजारवाडा, पानगल्ली, बारामती) हा आपले हस्तक नामे सत्तार मुबारक बागवान (वय-65, रा.फलटण रोड, बारामती), अशोक जगन्नाथ निकम (वय-55, शालीमार चौक, दौंड), दीपक महादेव लोखंडे (वय-45, रा.बेलवाडी, ता.इंदापूर), नटराज किसन कांबळे (वय-53, रा.दौंड पोस्ट ऑफिस समोर) यांचेमार्फत कल्याण मटका नावाचा जुगार आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना कल्याण मटका जुगारीच्या डुप्लीकेट आकड्याच्या चिठ्ठ्या फाडीत असताना इसम नामे भिमराव माणिक जगताप (वय-60, रा.शिर्सुफळ), करण कासिम मदारी (वय-36, रा.साठेनगर, कसबा), शरद अंकुश खवळे (वय-30 रा.सावळ, ता.बारामती), सतिश बन्सी खंडाळे (वय-50, रा.जळगाव कप, ता.बारामती), समशाद जमादार अन्सारी (वय-52, रा.गणेश मंडई दुकान नं.1 बारामती), तायासो बापु तावरे (वय-70, रा.बारामती) आप्पा संजय खरात (वय-32, रा.माळेगाव, ता.बारामती) लोबाजी बाजीराव वसव (वय 45, रा.पानगल्ली, बारामती), किरण छगन गाडेकर (वय 37, रा.कसबा, बारामती), सुनिल नारायण मदने (वय 40, रा.तावशी, ता.इंदापूर) हे मटका आकडे लावण्याकरीता आले असताना मटका जुगारीची साधने तसेच रोख रक्कम 1 लाख 82 हजार 680 अशा मालासह मिळून आले.
याठिकाणाहून दीपक महादेव लोखंडे यांची काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर 35 हजार रूपये किंमतीची जप्त करण्यात आली आहे. तर चॉकलेटी रंगाची सुझूकी ऍक्सेस मोटार सायकल मटका मालक मन्सुर शेख यांची असल्याची त्याचा पंटर सत्तार मुबारक बागवान यांनी सांगितले तिची अंदाजे किंमत 65 हजार व रोख रक्कम 1 लाख 82 हजार 680 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर अवैध धंद्याबाबत येथील युवकांनी लेखी स्वरूपात वेळोवेळी तक्रार देवूनही कोणतीही कारवाई होत नव्हती. मटका मालक मन्सुर शेख याच्यावर यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत त्यामुळे संबंधित इसमावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे. ज्या जागेत अवैध मटका धंदा सुरू आहे ती जागा सरकार जमा करून जप्त करण्यात यावी अशीही मागणीला जोर धरू लागली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.घोडके करीत आहेत.