पवारांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध – विजय शिवतारे

बारामती: येथील लोकसभा मतदार संघातून पवारांची जी हुकूमशाही सुरू आहे त्याला नागरीक वैतागले आहेत त्यामुळे पवारांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध असल्याचे पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

आता निवडणुकीतून माघार न घेता येत्या 12 एप्रिल रोजी निवडणुकीचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या भूमिकेमुळे महायुतीमधील वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली जाणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती कोणाचा सातबारा नाही, असे सांगत शिवतारे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना समज दिल्यानंतरही ते या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी कॉंग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेटही घेतली होती. सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव होईल, असा दावाही शिवतारे यांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. या पार्श्वभूमवीर शिवतारे यांनी रविवारी त्यांची भूमिका जाहीर करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधी भूमिका घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक त्यांनी घेतली.

अजित पवार यांनी दिलेले ओपन चॅलेंज नडणार आहे असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे. असेच चॅलेंज इतर तालुक्यात सुद्धा दिलेले असल्याने तेथील नेते व नागरीक सुद्धा नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा ना.अजित पवार यांना पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!