पुणे(प्रतिनिधी-प्रज्ञा आबनावे): प्रेमसंबंधातून बारामतीतील तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संग्राम हनुमंत साळुंके (वय 22, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणार्या एका विवाहित तरुणीची संग्राम याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तरुणीच्या पतीला याबाबतची माहिती मिळाली होती.
संग्राम तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती तरुणीचा पती नितीन रेणुसेला मिळाली होती. तो बिबवेवाडीतील किया सर्व्हीस सेंटरजवळ 2 डिसेंबर 2023 रोजी आला होता. आरोपी रेणुसे, गवळी, चव्हाण आणि दोन अल्पवयीन साथीदार यांनी पाळत ठेवली होती. त्यांनी संग्रामला गाठले. त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरात गॅस गोदामाजवळ नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तेथेच सोडून आरोपी पसार झाले. संग्रामला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संग्रामच्या खुनामागचे कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.