मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळातर्फे कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप
आलताफ सय्यद यांच्या अथक प्रयत्नातून मुस्लीम युवकांना रोजगाराला हातभार!
बारामती(वार्ताहर): आज सरकारच्या वतीने मी आलो आहे. यापुर्वी काही लोकांनी तुमची मते मिळविण्याचा प्रयत्न केला,पण त्या पटीत समाजाला काहीच दिले नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.
बारामतीत मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाच्यावतीने छोट्या व्यावसायिकांना साडेचार कोटींचे कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री.पवार बोलत होते.
यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफार पी. मूकदूम, सहायक व्यवस्थापक संदेश कदम, आविश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक रहीम मुलानी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, मुस्लीम कॉ. बँकेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, तरन्नुम सय्यद, इंद्रिस नायकवडी आदी उपस्थित होते.
पुढे श्री.पवार म्हणाले की, देशात राज्यात काहीही घडो, मात्र 1991 पासुन मला बारामतीत मुस्लीम समजाने कायम पाठींबा दिला. फक्त निवडणुकीवर डोळा ठेवुन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही. कोणतेही काम मनापासुन करण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणताही प्रसंग आला महायुतीत असलो तरी शाहु फुले आंबेडकरांची विचार धारा सोडलेली नाही असेही ते म्हणाले.
घेतलेल्या कर्जाचा वापर त्याच कारणासाठी करा. कर्जाची वेळेत परतफेड केल्यास वेगवेगळ्या भागात अल्पसंख्यांक समाजाला निधी देणे शक्य होईल. कर्जवाटप करताना व्यवसायिकांना प्राधान्य देण्याची सुचना पवार यांनी केली.
लवकरच लोकसभा निवडणुका लागतील, आजपर्यंत तुम्ही माझे एकत आलेला आहात. घड्याळाची साथ सोडलेली नाही. यंदाही तुमची साथ राहु द्या,तुमचे पवित्र मत द्या,असे भावनिक आवाहन पवार यांनी केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दूघर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
श्री. पवार म्हणाले, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळाकडून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी 30 कोटींवरुन 500 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाचे भागभांडवल 700 कोटी रुपयांवरुन 1 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने व्यापारी, महिला बचत गटांना सूक्ष्म कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महामंडळाडून देण्यात येणार्या कर्जाच्या अटी व शर्तीत सुधारणा करुन त्या सुलभ करण्यात आल्या आहेत. महामंडळाला आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध पदांची भरती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
राज्यात अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापन करण्यासोबच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना व्यवसायिक शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात आले असून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्सहान मिळण्याबरोबरच स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय, तांत्रिक अणि व्यवासायिक विषयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 40 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता अर्थसंकल्पात 10 कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. झाकेर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेकरीता 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक वर्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीच्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल.
बारामती शहराच्या वैभवात भर घालणारा दिमाखदार शादीखाना उभारण्यात आला आहे. उर्दू शाळेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचे कामाला सुरुवात लवकरच सुरु होणार आहे. अल्पसंख्यांक विभागाकडून् बारामती तालुक्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दफनभूमी, संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात अल्पसंख्यांक महिलांसाठी 2 हजाराहून अधिक महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी तालुक्यात अल्पसंख्यांक महिलांचे बचत गट स्थापन करण्यात येईल. समाजातील गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बारामती परिसरातील अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक मुस्लीम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी प्रास्ताविक करताना रमजान इद सणापुर्वी कर्जमंजुरी प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत संबंधितांना सुचना देण्याची मागणी केली. सुत्रसंचालन परवेज सय्यद यांनी केले तर शेवटी आभार सुभान कुरेशी यांनी मानले.
यावेळी हाजी कमरुद्दीन सय्यद, कासम कुरेशी, आस्लम बागवान, हाजी रशीद बागवान, मकसुद खान, इक्बाल शेख , निसार शेख, सिकंदर तांबोळी, जाकीर तांबोळी, गालीब सय्यद, महेबुब बागवान, युसुफ इनामदार, आदम झारी, कदीर झारी, इरफान इनामदार, मौनिद्दीन इनामदार , हुसेन पठाण, अशपाक सय्यद , जलाल आतार, सादीक मोमीन , महेबुब सय्यद , सलिम मोमीन इ. समाजातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.