बारामती: अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करावे, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत, असे हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दर्जा अजित पवार गटाला दिल्यानंतर पक्षनाव आणि पक्षचिन्हही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. परिणामी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार असे पक्षनाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले. परंतु, मूळ पक्षनाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयात आज या प्रकरणी सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस आणि पक्षाचे नाव राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे चिन्ह राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.