पुणे(प्रतिनिधी-प्रज्ञा आबनावे): जिल्ह्यातील चारही जागा महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने येतील व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षांमध्ये विरोधी पक्षातील अनपेक्षित नेते व पदाधिकारी प्रवेश करतील असा विश्र्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुण्यातील शिवसेना भवनात मंगळवारी (ता.19) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे संपर्क नेते संजय मशिलकर, पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, अजय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या सर्व योजनांचा मोठ्या प्रमाणावर नागरीकांना फायदा झाला आहे. राज्यात महायुती अत्यंत कार्यक्षमतेने काम करत असून महायुतीचे घटक पक्ष एकमेकांना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरणार आहेत. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची यंत्रणा उभी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसर्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री व लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुणे उपशहरप्रमुख व प्रवक्त्या विद्याताई होडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सामंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील कॉंग्रेसच्या प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये येत्या आठ दिवसांत विरोधी पक्षातील बडे राजकीय नेते, प्रवेश करतील.
मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर सामंत यांनी हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत सामंत म्हणाले, अंतर्गत वाद म्हणजे पक्षातील वाद. कोणी गैरसमज करून घेऊ नये. ती घटना दुर्दैवी आहे, असे मी तेव्हाच म्हणालो होतो. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सामंत म्हणाले, कोणी नाराज असल्याचे मी कोठे ऐकले नाही. महायुतीमधील आमच्या घटक पक्षांमध्ये पूर्ण समन्वय आहे.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत जर-तरच्या प्रश्नांवर बोलण्यात अर्थ नाही. अजून खूप वेळ आहे. अजित पवार यांनी शिवतारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांना राग असणे स्वाभाविक आहे. शिवतारे यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.