पुणे(प्रतिनिधी: प्रज्ञा आबनावे): मुंढवा केशवनगर ते मांजरी झेड कॉर्नरपर्यंत सतत होणार्या वाहतुक कोंडीमुळे व झालेल्या अतिक्रमणामुळे येथील नागरीक त्रस्त झाले होते. मात्र रस्त्याच्या रूंदीकरणाच्या काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याने येथील नागरीकांना वाहतुक कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे.
मुंढवा केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज ते मांजरी झेड कॉर्नरपर्यंत हा रस्ता सव्वादोन किलोमीटर लांब आणि 18 मीटर रूंद असणार आहे. 15 मार्च 2024 रोजी मुंढवा केशवनगर ते मांजरी याठिकाणी सततच्या वाहतुक कोंडीबाबात आ.चेतन तुपे आणि अति.आयुक्त विकास ढाकणे यांच्यात सकारात्मक बैठक झाली.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रात्री रस्त्याची पाहणी करून, अधिकार्यांच्या उपस्थितीत मार्किंग केली. गेल्या अनेक वर्षापासून येथील रस्ता रूंदीकरणापासून रखडला होता. महापालिकेने येथील अतिक्रमणावर केलेल्या कारवाईनंतर रस्त्याच्या कामास गती आलीआहे.
जिथं जागा मिळेल तेथील काम प्रथमत: करण्यात येईल. काही बाधित घरांबाबत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या घरांच्या मोबदल्याबाबत शासन स्तरावर बैठक झाली नाही मात्र, वरिष्ठस्तरावर याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती भूसंपादन विभागाच्या विभाग प्रमुख प्रतिभा पाटील यांनी दिली.
ज्या प्रमाणे युद्धपातळीवर कामास सुरूवात झालेली आहे तीच पातळी शेवटपर्यंत ठेकेदाराने ठेवली पाहिजे असे नागरीकांत बोलले जात आहे. अन्यथा रस्ता खोदून ठेवला, सुरक्षितेबाबत कुठल्याही उपाययोजना नाहीत. अपघात होण्याची दाट शक्यता अशा तक्रारीचा ओघ वाढू नये याची दक्षता संबंधितांनी घेतली पाहिजे. या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराचा निष्काळजीपणा किंवा वाहतुक विभागाचे दुर्लक्ष होता कामा नये अन्यथा अपघात झाल्यावरच प्रशासकीय यंत्रणा जागी होताना दिसते असेही स्थानिक नागरीक बोलताना दिसत आहे.
संबंधित ठेकेदाराने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सूचना फलक, ब्लिंकर्स लावणे किंवा सेवा रस्ते उपलब्ध करून देणेबाबतचे ठिकठिकाणी फलक लावणेत यावेत.