पुणे (प्रतिनिधी-प्रज्ञा आबनावे): पुणे जिल्ह्यात 1 हजार 51 शस्त्र परवाना धारक आहेत या सर्वांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.
शस्त्र परवाना घेणार्यांमध्ये जास्तीत जास्त हवेली त्यानंतर बारामती तालुका आहे. शस्त्र परवाना घेणार्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काहींच्या जीवाला धोका तर काहींना दैनंदिन रोख रक्कमेची हाताळणी करावी लागते तर काहींना स्वरंक्षणासाठी शस्त्र परवान्याची आवश्यकता असते.
जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाना देताना संबंधितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र अत्यावश्यक आहे किंवा नाही याची सखोल पडताळणी करूनच परवाना दिला जातो. एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास किंवा धमकी आली असल्यास त्याची तीव्रता पाहिली जाते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून परवाने देण्यात येतात. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 1051 जणांना शस्त्र परवाने दिले आहेत.
ग्रामीण पोलीस ठाण्यांकडे अर्ज केल्यानंतर सर्व अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होतात. अर्जांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांना परवाने दिले जातात किंवा नाकारले जातात. वैयक्तिक पिस्तुल बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी येणार्या अर्जांची संख्या मोठी असून कठोर पडताळणीनंतरच परवाने वितरीत करण्यात येतात. दिलेल्या परवान्यांपैकी दुपटीने परवाना देण्यासाठीचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.