दांडेकर पूल, पुणे स्टेशन परिसरातील मटका, जुगाराच्या अड्‌ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे(प्रतिनिधी-प्रज्ञा आबनावे): शहरातील दांडेकर पूल आणि पुणे स्टेशन परिसरात जुगार, मटका अड्डयांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड आणि मोबाइल संच असा 2 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.
पुणे शहर आयुक्तपदी अमितेश कुमार आलेपासुन अवैध धंदे करणार्‍यांनी धसका घेतलेला आहे. सर्वसामान्य नागरीकांनी थेट संपर्क साधुन अवैध धंदे करणार्‍यांची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आवाहन सुद्धा केले होते.
सदरची कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार बाबा कर्पे, हनुमंत कांबळे, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, अमित जमदाडे, किशोर आंधळे, इम्रान नदाफ, अजय राणे यांनी केली होती.
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात एका खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे पत्यांवर जुगार सुरू असल्याचे उघडकीस आले. जुगार अड्‌ड्यावर कारवाई करून पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले. जुगार अड्डा मनोज आडे (रा. दांडेकर पूल) चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार अड्‌ड्याला बाहेरून कुलुप होते. आतमध्ये जुगार खेळण्यात येत होता.
पुणे स्टेशन परिसरात मटका अड्‌ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांना पकडले. त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!