भारत देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांचा बारामतीच्या व्यापार्यांनी मेळावा घेण्यास टाळाटाळ केली. बारामतीच्या घडामोडीत खासदार पवार साहेबांचे कोणतेच योगदान नाही असे मानून काही व्यापार्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. पवार साहेबांनी व्यापार्यांसाठी काय नाही केले. व्यापार्यांच्या हितासाठी केंेद्र व राज्यात विविध प्रश्र्न उपस्थित केले. त्यामाध्यमातून बाजार भाव मिळण्यास, मालाची आयात निर्यात वाढली.
आगामी लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या महायुतीच्या तर सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील. या लढाईमुळे अजितदादा गट आणि शरद पवार गटाकडून सध्या बारामतीमधील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील व्यापारी महासंघ सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी व्यापारी महासंघाकडे एक मेळावा घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु, व्यापारी महासंघाने त्याला नकार दिला होता. याबाबत शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मला बारामतीमध्ये व्यापारी मेळावा घ्यायचा होता. हा मेळावा घेणे शक्य नसल्याचे व्यापारी महासंघाकडून मला कळवण्यात आले. गेल्या 50 वर्षांमध्ये असे कधीच घडले नव्हते, अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे अजित पवारांच्या दहशतीमुळे व्यापार्यांनी हा निर्णय घेतला का, अशी चर्चाही बारामतीमध्ये रंगली होती.
शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर बारामतीच्या व्यापारी महासंघाचे धाबे दणाणले आहे. व्यापारी महासंघाकडून लगेचच सारवासारव करत शरद पवारांच्या कोणत्याही मेळाव्याला नकार दिला नसल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. पवार साहेबांनी यापूर्वी आम्हाला मेळाव्यासंदर्भात विचारणा केली होती. परंतु, अपुर्या वेळेमुळे हा मेळावा आता घेऊ नये, असे आम्ही म्हटले होते. परंतु, शरद पवारांचा गैरसमज झाल्याने आम्ही मेळावा घेण्यास नकार दिल्याचे त्यांना वाटले, असे व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले. आम्ही बारामतीत लवकरच व्यापारी मेळावा घेऊ. त्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांची वेळ घेणार आहोत, असेही महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.
बारामतीमधील कोणत्या व्यापार्याला महासंघाचा फायदा झाला हे एकाही व्यापार्याने छाती ठोकपणे सांगावे. बारामतीच्या व्यापार्यांना वर्गणीदार, आंदोलक, पार्किंगमुळे होणारा त्रास, शॉपऍक्ट अधिकार्यांचा, अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांचा इ. नाहक त्रास सहन करावाच लागत आहे. व्यापारी महासंघ याकडे कानाडोळा करीत आहे. व्यापार्यातील काही टोळकी म्हणजे व्यापारी महासंघ नव्हे. तर सर्वांना बरोबर घेऊन जाणारी एखादी संस्था असेल तर ती नावारूपाला आल्याशिवाय राहत नाही.
ज्याप्रमाणे मध्यंतरी व्यापार्यांनी ना.अजित पवार यांचा मेळावा घेतला. काही व्यापार्यांच्या मते संपूर्ण व्यापारी महासंघ एखाद्या विशिष्ठ पक्षाच्या दावणीला बांधल्याप्रमाणे झाले. उद्याला कोणताही पक्ष उठेल आणि आमचा मेळावा घ्या असे म्हणेल त्यामुळे व्यापारी राजकारणापासून दूरच असला पाहिजे. काही अघटीत घटना घडली तर दुकाने बंद ठेवावी लागतात. काही वेळेस सर्वांना समान न्याय देण्यासाठी व्यापारी महासंघ मागे पडताना दिसत आहे. एका समाजाला निम्मा दिवस बंद तर काहींना संपूर्ण दिवस बंद ठेवण्यासाठी आग्रह केला जात असेल तर व्यापारी महासंघामध्ये एकसमानता कधी येणार हेच अद्याप कळत नाही.
प्रथमत: व्यापारी म्हणजे कोण याची तंतोतंत व्याख्या व्यापारी महासंघाने केली पाहिजे. व्यापार्यांनी खा.पवार साहेबांचा मेळावा टाळला म्हणून बारामतीत नव्याने स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना होत आहे. त्यांच्या मते मोजके दोन-चार जण म्हणजे व्यापारी महासंघ होऊ शकत नाही. बारामती शहराचा वाढता परिसर पाहता व्यापार्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे दुजाभाव करणार्या व्यापारी संघापेक्षा नव्याने स्वाभिमानी व्यापारी महासंघ वरचढ ठरेल असे दिसत आहे.