बँकेच्या वाटचालीत खा.शरदचंद्रजी पवार व खा.सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य नाही का? : सभासदांमध्ये चर्चा
बारामती(वार्ताहर): बँकेच्या 31 मार्च 2023 अखेरच्या आर्थिक प्रगतीनुसार रिझर्व बँकेने सभासदांना त्यांच्या भागावर शेकडा 5 टक्के दराने लाभांश जाहीर करण्यास परवानगी दिली आहे.
बँकेच्या वाटचालीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच बँकेचा विकास होत असल्याचे बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी बँकेच्या प्रत्येक अहवालात खा.शरदचंद्रजी पवार, बारामतीच्या खा.सुप्रिया सुळे यांचा फोटो व बँकेच्या वाटचालीत योगदान असल्याचे नमूद केलेले असे. मात्र, अचानक बारामती
बँकेच्या 62 व्या म्हणजे सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात सुप्रिया सुळेंचा फोटो टाकला नाही. बँकेच्या प्रत्येक घडामोडीत प्रसिद्धी पत्रकात सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय बारामतीच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे असे लिहिलेले असायचे, मात्र सद्यस्थितीला पाहिले असता बँकेच्या वाटचालीत अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यामुळे बँकेच्या सभासदांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.
काही सभासदांच्या म्हणण्यातून पवार साहेब व ताईंनी बँकेच्या वाटचालीत कोणतीच मदत, सहकार्य किंवा मार्गदर्शन मिळाले नाही का?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. बँकेच्या वाटचालीत सुद्धा दोन गट पडले आहे का? असाही प्रश्र्न सभासदांना पडलेला आहे.
बारामती बँकेचे कामकाज राजकारण विरहीत आहे आजपर्यंत बँकेच्या वाटचालीत ज्या कोणी सहकार्य केले त्यांची नावे काढून बँक कोणा एका पक्षाच्या दावणीला बांधायची आहे का? असेही सभासदांमध्ये बोलले जात आहे.
आर्थिक संस्था समाजाच्या विकासासाठी असतात, राजकारणासाठी नाही असे कै.पोपटराव तुपे हे सतत सांगत होते.
बँकेच्या दैनंदिन कामकाजात ज्यांची मदत होते त्यांचेच नाव टाकले आहे. केंद्र व राज्याची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सौ.सुनेत्रा पवार यांची टेक्सटाईलच्या माध्यमातून बँकेस मदत होते. सौ.सुनेत्रा पवार या बँकेच्या सभासद आहेत त्या बँकेच्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असतात. बँकेत कोणतेही राजकारण नाही गट-तट नाही. बँकेचे सहा जिल्ह्यात काम आहे.
- अध्यक्ष, सचिन सातव
चालू अहवालात खा.सुप्रिया सुळेंचा फोटो न छापण्यावर अध्यक्ष सचिन सातव म्हणाले, सहा जिल्ह्यात काम बँकेचे आहे मग प्रत्येकाचा फोटो छापावा लागेल त्यामुळे काही धोरणामुळे छापला नाही.