बारामती(वार्ताहर): येथील इतिहास अभ्यासक गणेश धालपे यांची संकल्पना व लेखन असलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असणार्या राजगड किल्ल्याचा त्रिमितीय माहितीपटाचे दर्शन घडविणारे पहिलेच फिरते प्रेक्षागृह सुरू करण्यात आले आहे.
त्रिमितीय माध्यमातून तयार केलेल्या ’गडांचा राजा… राजांचा गड-राजगड’ या माहितीपटाचे प्रयोग बारामती येथे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमांचकारी इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणार्या गडकोटांचे दर्शन घडविण्यासाठी देशातील पहिल्याच फिरत्या त्रिमितीय प्रणालीची आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्ञानरंजनासाठी कल्पकतेने प्रभावी वापर करण्यात आला आहे.
’इतिहास चक्र’ निर्मित प्रकल्प सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी इतिहास व वारसास्थळांचे पर्यटन करणार्या ’आनंदयात्रा पर्यटन’चे विशेष सहकार्य लाभले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून निर्माण केलेला हा प्रयोग म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती देणारी अनुभूतीसंपन्न सर्वांगसुंदर आनंदयात्रा आहे. सिल्व्हर स्क्रीनवर दाखवला जाणारा हा माहितीपट विशेष प्रकारचे गॉगल घालून अनुभवता येतो. राजगडाचे विहंगम दर्शन यातून घडते. हा प्रकल्प संपूर्ण देशातील सर्व राज्यांमधे अबालवृद्धांसाठी राबविण्यात येणार आहे. सर्व वयोगटांसाठी आनंददायक असणारा हा माहितीपट पहाताना प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना प्रत्यक्ष दुर्गभ्रमंती केल्याची आभासी अनुभूती मिळते. यात इतिहास, तंत्रज्ञान आणि मनोरंजन यांचा अनोखा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना प्रेक्षागृहात अनुभवता येतो.
किल्ले राजगडाच्या पद्मावती, सुवेळा व संजीवनी या तीन माच्या आणि बालेकिल्ला, तसेच गडावरील पाण्याचे तलाव, दरवाजे, मंदिरे, गडवाटा, वाडे, डोंगरदर्या यांची मनोहारी अनुभूती देणारी ही सर्वांगसुंदर त्रिमितीय आनंदयात्रा आहे. बारामती येथे हा ऐतिहासिक विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी ’आनंदयात्रा पर्यटन’चे राजेंद्र धालपे, श्रीकृष्ण येकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
राजगडसारखा दुर्गम किल्ला हा त्रिमितीय माहितीपट पाहताना प्रत्यक्ष फिरून आल्याचा प्रत्यय आला. याचा आनंद आम्ही घेतला. हा प्रकल्प ऐतिहासिक आणि शैक्षणिक असल्याने सर्वांसाठी उपयुक्त असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी तो अवश्य पहायला पाहिजे, असे उत्स्फूर्त उद्गार प्रेक्षकांनी काढले.