10फेब्रुवारीपासून नव्या बसस्थानका बाहेर अमरण उपोषण सुरू
बारामती(वार्ताहर): येथील संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक ठरेल अशा अत्याधुनिक उभारण्यात आलेल्या बारामती बसस्थानकास विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने विविध आंदोलन, उपोषणे करण्यात आली. तरी सुद्धा राज्यकर्ते व प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे यांच्या नेतृत्वाखाली विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बारामती बसस्थानक नामांतर कृती समिती (महाराष्ट्र राज्य) स्थापन करून शनिवार दि.10 फेब्रुवारी 2024 पासून बारामती बसस्थानका बाहेर चक्री अमरण उपोषण करण्यात आले आहे.
बसस्थानकास नाव देवून, ज्या लोकांच्या जागा या बसस्थानकास घेतल्या आहेत त्या भूमिपूत्रांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एस.टी. महामंडळात नोकरी किंवा उद्योग व्यवसायासाठी गाळे मिळावेत तसेच आगार प्रमुख सौ.तांबे व कानडे यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदरचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, बारामतीचे आमदार अजित पवार व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
चक्री अमरण उपोषणास प्रशांत विष्णू सोनवणे, गणेश चव्हाण, तुषार गायकवाड, दत्तात्रय माने, महेबुब सय्यद, रूक्मिणी चव्हाण, सौ.कांचन भोसले, हनुमंत बनसोडे, शिकिंदा भोसले, गणेश भोसले, सचिन लोंढे यांचा समावेश आहे.