बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.
ज्याप्रमाणे अजित पवार गट बारामती लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांची मूठ बांधीत आहेत त्याच पटीत खा.शरदचंद्रजी पवार गटातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी कंबर कसली आहे. अजित पवार गटात पक्षांतर्गत असणार्या गटा-तटामुळे बारामती लोकसभा निवडणूकीत जिंकणे अशक्य होईल असे पक्षातील कार्यकर्ते व नागरीकांमध्ये बोलले जाऊ लागले आहे.
मध्यंतरी सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या फलकाला काळीशाई लावणे, रूई येथील कार्यक्रमात खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घोषणा देवून शरद पवार गटात युवकांनी प्रवेश करणे. बारामती तालुका ग्रामीण भागात कार्यकर्ते युवकांमध्ये संघटन बघायला मिळत नाही. जिथं-तिथं गट-तटाचे राजकारण पाहिला मिळत आहे.
मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका. शेवटची निवडणूक आहे, असे सांगून भावनिक केले जाईल; पण विकासकामे करायची असतील, तर माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या असे त्यांच्या खास शैलीत आवाहन केल्यामुळे बारामतीत मतदार भावनेला साद देणार की, विकासाला साथ, यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार आहे. पण याच बरोबर काही मतदार अशा वक्तव्यामुळे नाराज सुद्धा झालेले दिसत आहेत.
काही मतदारांच्या मते इतक्या दिवस देवाची उपमा पवार साहेबांना मिळत होती. अचानक देवाकडून काय चूक झाली असेही बोलले जात आहे.
शरदचंद्रजी पवार गटामध्ये गट-तट नाही. त्यामुळे याठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकार्यांना काम करण्याची संधी आहे. मात्र, अजित पवार गटात एका गटाने कार्यक्रम घेतला की, दुसरा गट गैरहजर असतो आणि गैरहजर गटाने कार्यक्रम घेतला की तिसरा गट गैरहजर असतो. पक्षांतर्गत गट-तट वादामुळे येणारी लोकसभा निवडणूक ना.अजित पवार यांना वाटती तेवढी सोपी जाणार नाही. त्यामुळे अजितदादांचा ज्याच्यावर गाढा विश्र्वास आहे त्यास एकहाती सर्व कारभार पहावयास भाग पाडावे किंवा गट-तटाचे अंतर्गत सुरू असलेले राजकारण थांबवावे.