बारामतीतील एका नामांकित बँकेचा सावळागोंधळ! : एम.डी.ची व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर सतत अवहेलना : उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देतील का?

बारामती(प्रतिनिधी): अल्पावधी काळात संपूर्ण राज्यात बँकींग क्षेत्रात दर्जेदार कामातून जाळे निर्माण करणार्‍या बारामतीतील एका नामांकित बँकेत सुरू असलेल्या सावळागोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार जातीने लक्ष घालणार का? अशी बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्मचारी व अधिकारी यांची मागणी जोर धरू लागली आहे.

बँकेच्या कामात सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सतत जोडलेले असावे या उद्देशाने बँकेचा एक ग्रुप कामगार प्रतिनिधीने सुरू केला म्हणे, बँकेच्या चेअरमन पदानंतर कार्यकारी संचालक (एम.डी.) हे उच्चपद आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. या ग्रुपमध्ये कार्यकारी संचालकाची एवढी अवहेलना म्हणजे अवज्ञा, अपमान व तिरस्कार होईल अशा पोस्ट बँकेचे कर्मचारी प्रतिनिधी टाकत असतात. यावर बँकेचे कार्यकारी संचालक भ्रशब्द न बोलता बुक्क्यांचा मारा सोसत आहेत.

या प्रकाराबाबत बँकेचे चेअरमन फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. काहींच्या मते चेअरमन व कामगार प्रतिनिधी संगनमताने कार्यकारी संचालक यांना नाहक त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. बँकेच्या कर्मचारी प्रतिनिधीने उच्चपदस्थ असणार्‍या कार्यकारी संचालकाची अवहेलना करणार्‍या पोस्ट टाकणे म्हणजे हत्ती चले बाजार कुतै भोके हजार असा आहे. एम.डी. हे सर्व गैरकृत्य पाहुन त्याकडे कोणामुळे दुर्लक्ष करीत आहेत हेच न उलघडणारे रहस्य आहे.

सध्या बँकेत चेअरमन म्हणेल तीच पूर्व दिशा इतर संचालक मंडळ तर नजर लागू नये म्हणून चौकटीला अडकविलेल्या संवेदना नसलेल्या बाहुल्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था इतर संचालक मंडळाची झालेली दिसत आहे. या संचालक मंडळात काही संचालक तज्ञ आहेत तर काहींचा बँकींग क्षेत्रात गाढा अभ्यास आहे मात्र, चेअरमनच्या मनमानी काभारामुळे या संचालकाच्या गाढा अभ्यासाला त्यांच्या बुद्धीला गंज चढलेला आहे असे दिसत आहे.

बँकेत मनमानेल त्याची बदली, बढती सुरू आहे. कित्येक अधिकारी व कर्मचारी बारामतीत ठाम मांडून आहेत त्यांची बदली कधीच होत नाही अशीही शोकांतिका आहे.

मध्यंतरी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कामगाराबाबत प्रश्र्न उपस्थित झाले होते, त्या प्रश्र्नावर कामगार संघटनेने सांगितले आम्ही बँकेच्या हितासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. मात्र या कामगार संघटनेचा तसा ठराव झालेला आहे का? कामगारांनी त्यास सर्वानुमते संमती दर्शविली आहे का? असे अनेक मुद्दे आहेत मात्र सध्या कार्यकारी संचालकांपासून अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची गळचेपी सुरू आहे. कित्येक कर्मचारी व कामगारांनी राजीनामे दिले याबाबत बँकेचा एकहाती कारभार सांभाळणार्‍या चेअरमनचे कान धरून चुका दाखविणारे कोण तयार होणार की नाही.

चेअरमन व कामगार प्रतिनिधीला यांच्या इशार्‍यावर नाचणारा थोडक्यात ताटाखालील मांजर, जवळचा, नात्यातील, लाचार, लाळघोटेपणा करणारा एम.डी.आणावयाचा आहे का? असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!