बारामती तालुक्याच्या पश्चिमेला वसलेलं आमचं छोटसं करंजे गाव. बारा वाड्या अन तेरावं करंजं. तसा आमच्या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक सोमेश्वर मंदिर हे याच गावात आहे. ‘सोमायाचे करंजे’ म्हणून आमचे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. साधारणतः ऐंशीच्या दशकात जन्मलेली आमची पिढी. त्या काळात जन्मलेल्या आमच्या पीढीने अनुभवलेलं गाव हे आजच्या पीढीला बहुधा ठाऊक नसेल. तसेही पीढ्यांमधल्या अंतराचे चक्र हे निरंतर चालत राहते.
दरवर्षीच्या उन्हाळ्याप्रमाणे त्याही वर्षी कडक उन्हाळा होता. वरुन आग ओकणारा सूर्य, तळपलेली जमीन, या तापलेल्या जमीनीतून निघणाऱ्या गरम झळया अंगाला शेकुन जात होत्या. दररोजचा येणारा दिवस हा असाच असायचा. दुपारी बारा नंतर घराबाहेर निघायला नकोच वाटायचं. त्यात लोडशेडींग! बारा- बारा तास गावात लाईट नसायची. त्यामुळे पंखा असूनही त्याची हवा खाता येत नसे. तेव्हा करमणुकीचे साधन म्हणून केवळ टी.व्ही. हाच एकमेव पर्याय होता आणि त्यावरही एकच वाहिनी. ती म्हणजे दूरदर्शन. कार्यक्रम कमी आणि जाहिरातीच जास्त. अन त्यातही स्पष्ट दिसणाऱ्या चित्रापेक्षा त्या काचेवर मुंग्याच जास्त नाचायच्या. बातम्या सांगणारी बाई एका ठराविक लयीवर वाकडी तिकडी होत बातम्या सांगायची. मग घरावर चढून कुठे अँटेना हलव, वायरच हलव, टी.व्ही.ला फटके मार अशी खटपट करावी लागत असे. ‘आलं का रे चित्र असे वर चढणारा विचारत असे व खालून ‘नाय… नाय’ असे उत्तर येई. जोपर्यंत चित्र व्यवस्थित दिसत नाही तोपर्यंत अँटेना सेट करायची ही खटपट थांबत नसे.
अशाच या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भर दुपारी करमणूक म्हणून गावात लोक समूहाने बसायची. गप्पा – गोष्टी करायची, थट्टा-मस्करी चालायच्या. ज्येष्ठ मंडळी सावलीचा आसरा शोधून पहुडलेली असायची. गावात एक मोठा पार होता परंतु त्याचा कडूनिंब वटलेला होता. त्याला एकही पान उरलेले नव्हते. त्यामुळे सावलीचा विषयच नव्हता. मराठी शाळेचा व्हरांडा, पोस्ट ऑफिसची जुनी कौलारु इमारत, दवाखान्याची इमारत व मारुतीचे मंदिर अशी सावलीची ठिकाणं. त्यातल्या त्यात मारुतीच्या मंदिराचा सभामंडप हा जुन्या सागवानी लाकडांनी अच्छादित असल्याने त्यामध्ये बसायला थंडगार वाटायचे. बहुतेक मंडळी देवळात बसायला प्राधान्य दयायची. काही वामकुक्षी घेत असायची. तर काही गप्पा मारण्यात दंग असायची.
एके दिवशी दुपारी आम्ही पोरं-पोरं पोहून घरी आलो. लोड शेडिंग असल्याने जेवण करून वेळ घालवण्यासाठी गावामध्ये बसायला गेलो. दवाखान्याच्या ओसरीवर मी व माझ्या आत्याचा मुलगा लल्या म्हणजे त्याचं खरं नाव प्रशांत. त्याला लल्या असे नाव ठेवले होते. आपल्याकडे चांगल्या नावांचा शॉर्टफॉर्म करण्याची फार जुनी परंपरा आहे. तसाच माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म रज्या. असे आम्ही झेल्या, पिंट्या, मल्या, सच्या, दत्त्या, बंट्या असे सर्वजण पत्ते खेळायला बसलो. सर्व म्हणाले ‘तिरेट’ खेळूया, तिरेट म्हणजे तीन पत्त्यांचा खेळ. त्या खेळातील डावाला हँड म्हणून काहीतरी लावण्याची पद्धत आहे. सुरुवातीला डावाला चिंचोके लावले. हळू हळू डाव चिंचोक्यांवरुन गोट्यांवर आला. खेळाची रंगत वाढत चालली होती. पत्यांची पाने न बघता क्लोज खेळायचं ठरलं. डावासरशी खेळामध्ये सर्वजण समरस होऊ लागली. एक डाव असा आला की, काहींना चांगले पत्ते न आल्याने पाच ते सहा जण पॅक झाले. पिंट्या आणि लल्या हे दोघे त्या डावामध्ये उरले. दोघांनीही आपआपले पत्ते पाहिले नव्हते. दोघेही बंद डावावर गोट्या लावत होते. ठराविक वेळेनंतर दोघांनीही आपआपले पत्ते पाहिले. पाहून आणखी पुढे खेळायचे ठरले. बहुधा दोघांकडे चांगले पत्ते असावेत असा आम्ही अंदाज बांधला. मागे हटायला कोणीच तयार नव्हते. गोट्या संपल्या तसा लल्या मला म्हणाला, ‘रज्या, जा आपल्या अड्ड्यातल्या गोट्या घेऊन ये.’ आमचा अड्डा म्हणजे आम्ही दोघांनी पातीत (पार्टनरशीप) मध्ये जिंकलेल्या गोट्या. जवळपास दोन हजार गोट्या असतील. मी धापा टाकत गोट्या साठवलेली बदली घेऊन आलो. आमचा खेळण्याचा गोंगाट इतका होता की, गावातली काही माणसं नेमकं काय चाललंय हे पाहायला त्याठिकाणी आली. त्यामध्ये आमच्यापेक्षा वयाने मोठी असणारी मंडळीही जमा झाली. त्यांनी दोघांचे पत्ते उघडून पाहिले. कोणालाही काही न बोलता खेळ पुढे सुरू करा असे त्यांनी नजरेनेच खुणावले. अन त्या दोघांना मागे सरकवून आप्पा मामा आणि मुक्या मामा खेळात सामील झाले. लल्याच्या बाजूने आप्पा मामा अन पिंट्याच्या बाजूने मुक्या मामा. डाव पुन्हा सुरू झाला. आतापर्यंत दोघांनीही पत्ते पाहिले होते. मागे हटायचे नाही असा दोघांनीही चंग बांधला. आम्ही पोरं राहिलो बाजूला अन मोठ्यांचा डाव सुरु झाला. आमच्याकडच्या सर्व गोट्या संपल्या. आता शेवट होईल असे वाटले. पण आप्पा मामा आणि मुक्या मामा यांनी खिशात हात घालून सुट्टे पैसे डावावर लावले. दहा-वीस करता करता एक हजारावर डाव गेला. माघार कोणीच घेईना. शेवटी मुक्या मामाने ‘खोल’ दिला. लल्याला होतं ‘राजा’चं तिरेट अन पिंट्याला ‘राणी’चं. शेवटी लल्या जिंकला. शिगेला पोचलेल्या उत्सुकतेचा शेवट झाला.गोट्या आणि पैशांचा खच समोर होता.
त्या डावाची चर्चा गावात चांगलीच रंगली, अन त्या चर्चेची हवा माझ्या घराला जाऊन केव्हा धडकली हे मला कळलेच नाही. करडा स्वभाव असणारे माझे वडील त्यावेळी नेमके त्यादिवशी घरी होते. त्यांना ही गोष्ट समजली होती. मी घरी जाताच, “चांगला जुगारी झालास की….” असं म्हणून डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच माझ्या कानशीलात अशी म्हणून एक चपराक दिली की, माझ्या डोळ्यांसमोर काजवेच चमकले. चिंचोक्यावर नाही की गोट्यावर नाही. पुन्हा पत्ते खेळलास तर याद राख. गंमत म्हणून खेळायला जाशील आणि तशीच सवय लागेल आणि अट्टल जुगारी होशील असा सज्जड दम भरला व मला बेदम धुतले. तेव्हापासून ते तिरेट माझ्या कायमचं लक्षात राहिले. पुन्हा कधी त्या खेळाच्या वाटेला गेलो नाही. ते खेळणारे आम्ही पोरं सुद्धा पुन्हा तो खेळ खेळलो नाही. आज बऱ्यापैकी आम्ही सर्वजण आमच्या कामधंद्यात सेटल झालो आहोत. मोबाईल व इंटरनेट आले आणि या जगात ते एकत्र येणे, पोहणे, सुरपाट्या, लगोरी, गोट्या, विटी दांडू, सूर पारंब्या, चक्र फिरवणे इ. यांसारखे खेळ काळाच्या ओघात हरवून गेले.

© रजनीकांत गायकवाड
मु. सा. काकडे महाविद्यालय,
सोमेश्वरनगर
9545993878