पुणेः तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते. त्यामुळे जर मी अदृश्य शक्तीच्या जागी असते तर मी ईडी, सीबीआय या भानगडीत पडले नसते आणि गॅसचे दर कमी केले असते अशा शब्दांत पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर खा.सुप्र्रिया सुळेंनी टीका केली.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या धनकवडी येथील एका कार्यक्रमास आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीचा त्यांच्या भाषणामधून चांगलाच समाचार घेतल्याचे पाहण्यास मिळाले.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता काय असते, मी ते आयुष्य अगदी जवळून पाहिलं आहे. सत्तेचं एकच कारण आहे. ते म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवणं, त्यामुळे सत्तेमधील आमदार, खासदार आणि आम्ही बघा, अशा शब्दांत सत्ताधारी पक्षांवर त्यांनी टीका केली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, माझे वडील फार म्हणजे फार कमी बोलतात आणि ते कोणालाही सल्ला देण्यास जात नाही. पण माझ्या वडिलांची बदनामी करण्यासाठी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे लागली आहे. मला ती अदृश्य शक्ती माहिती नाही. पण मुख्यमंत्री सतत म्हणतात की,अदृश्य शक्ती महाराष्ट्र चालवते, त्यामुळे मी विचार करायला लागल्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले. तांत्रिक मांत्रिक असेल किंवा वेगळी कोणती ऊर्जा आहे का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर सुळे यांनी टीका केली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राजकारण जरुर करावे, ते देखील मुद्देसुद करावे आणि ते राजकारण लोकांच्या भल्यासाठी करावे. आता मला एक सांगा की, परवा आमच्या रोहितला ईडी मार्फत नोटीस आली. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? असा सवाल उपस्थित नागरिकांना त्यांनी केला.
तुमची ही लेक संघर्षाला कधीही घाबरत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख असतात. त्यामुळे नेहमी म्हणतात ना, प्रत्येकाच्या घरी मातीच्याच चुली ना, त्यामुळे संघर्षात एक वेगळीच मजा असते. आता कोर्टात प्रकरण गेल्याने और लढेंगे, ही एक वेगळीच गंमत असून तत्व, आदर आणि प्रेमाची ही लढाई आहे. ही लढाई काही वैयक्तिक नाही.
माझ्या आईचे एक संस्कार आहेत. आपण कोणाच्याही एका ताटात जेवण केले असेल ना, त्याच्या विरोधात कधीच बोलायाचे नाही. ते उपकार कधीच विसरू द्यायचे नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.