मुंबई: राम मंदिरासाठी संघर्ष करणारे वेगळे होते, पण सध्या रामाच्या नावाचा फायदा उचलणारे वेगळे आहेत असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
उत्तर मुंबईतील भाजपाचे जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना भाजपवर टीका केली. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. सत्ताधारी पक्ष सोडून विरोधातील पक्षात येणार्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज दिल की बात ऐकली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मुंबईवर संकटे आली तेव्हा शिवसेना धावून गेली आहे. शिवसेनेने ज्यांना जीवदान दिले. त्यांनीच आता शिवसेना संपविण्याचा विडा उचलला आहे. प्रभू राम, भगवान श्री कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, या सर्वांचा भगवा एकच आहे पण त्यांनी भगव्यातही भेद केला आहे.
मंदिर अपूर्ण असताना मूर्ती प्राणप्रतिष्ठा करू नये असे जगद्गुरू शंकराचार्य हे जाहीर सांगत आहेत. पण राजकीय, स्वार्थापोटी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा अट्टहास केला जात आहे. त्यामुळे भाजपचा प्रवास हा राम राज्याकडून रावण राज्याकडे सुरू झाला आहे असे उपाध्याय यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबधित असलेल्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हे पसंत नसल्याने मुंबईतील शेकडो भाजप कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करीत असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.
यावेळी विहिंपचे घनश्याम दुबे बजरंग दलाचे अक्षय कदम, भाजपच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष माधवी शुक्ला, महासचिव राम उपाध्याय, आखिल भारतीय ब्राह्मण परिषदेचे महासचिव संजय शुक्ला, शिंदे गटाचे प्रदीप तिवारी, विश्व हिंदू परिषदेचे दीपक दुबे, दिनेशकुमार यादव, बजरंग दलाचे सूरज दुबे आदी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.