बारामती: अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या श्रीमंत आबा गणपती महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि.27 सप्टेंबर रोजी कलाकार भरत शिंदे यांचे तू तू मी मी नाटक हाऊसफुल ठरणार असल्याचे दिसत आहे.
1998 साली आलेले, केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ’तू तू मी मी’ हे सुपरहिट नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचा घाट सुपरस्टार भरत जाधव यांनी केला आहे. तत्पूर्वी या नाटकाचे सुमारे एक हजाराचे वर प्रयोग झाले असतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी या नाटकात केलेल्या विविधरंगी भूमिका आता स्वत: भरत जाधव साकारताना दिसत आहे. भरत जाधव यांच्या साथीला कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव, ऐश्वर्या शिंदे हे कलाकार आहेत.
मनोरंजनाची कितीही नवी माध्यमे आली तरी डोळ्यांसमोर घडणार्या जिवंत नाटकाची सर कशालाच येणार नाही. म्हणूनच या सजीव नाट्य कलेची कलावंतांना जितकी गरज आहे, तितकीच रसिक प्रेक्षकांनाही आहे. युवकांना आणि येणार्या पिढीला नाट्य वारसा मिळावा, तो जपला जावा यासाठी अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ दरवर्षी अविरत कार्यरत असतात.
तरी जास्तीत जास्त प्रेषकांनी या तू तू मी मी या नाटकांचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष वैभव जगताप यांनी केले आहे.