इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके) : वालचंदनगर कंपनीतील कामगारांची थकीत देणी व इतर प्रश्न मार्गी लावणेसाठी कंपनीचे मालक चीराग शेठ दोशी यांचेशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.15) लाक्षणिक उपोषण स्थळावरून सकारात्मक चर्चा केली.
वालचंदनगर कंपनीतील आय.एम.डी. कामगार समन्वय संघटनेने कामगारांची थकीत देणी मिळावीत या व इतर मागण्यासाठी मंगळवार दि.15 रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणास हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड, संजय नकाते, राहुल बावडेकर आदींनी कामगारांच्या मागण्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समोर मांडल्या. याप्रसंगी कंपनीतील कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी मालक चीराग शेठ दोशी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. सदरची चर्चा सकारात्मक झाली. वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य राहील, असे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.