15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज 76 वर्ष उलटून गेले, मात्र सद्यस्थितीला या स्वातंत्र्याचा आढावा घेतला असता जास्तीचे स्वातंत्र्य मिळाले का? असा प्रश्र्न निर्माण होत आहे. सध्या भारतात जाती-जाती, धर्मा-धर्मामध्ये द्वेष पेरण्याचे काम सुरू आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण ज्या पटीत प्रगती केली त्या पटीत द्वेष सुद्धा उभारून येत आहे. स्व.धीरूभाई अंबानी यांनी त्यावेळी करलो दुनिया मुठ्ठीमें हे ब्रीद वाक्य आजच्या परिस्थितीत खरे ठरत आहे.
जो तो सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊन सोशल मिडीया चाळण्याचे काम करीत असतो. भावना दुखाविणारी पोस्ट बघितल्यावर आणखीन पित्त खवळण्याचे काम होत असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले म्हणून कोणीही कोणाच्या धर्म, जातीचा अपमान करू नये. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्या स्वातंत्र्याचे नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. संपूर्ण देशात कोणत्या कोपर्यात दोन समाजात तेढ निर्माण झाला तर त्याचे पडसाद गावापर्यंत उमटलेले असतात.
सोशल मिडीयावर येणारी बातमी किंवा घटना कितपत खरी आहे याची शहानिशा न करता सध्याचे युवक ते फॉरवर्ड करण्यामध्ये दोन पाऊल पुढे आहेत. मात्र फॉरवर्ड केलेल्या पोस्टमुळे कित्येकांची मने दुखावली जाणार याबाबत त्यांना काही एक घेणे देणं नाही. सर्व क्षेत्रात राजकारण घुसले आहे. राज्यकर्त्यांना काय साध्य करायचे असल्यास युवक पिढीच्या चनचल बुद्धीला द्वेष पसरविण्यासाठी आणखी चालना देण्याचे काम केले जाते. मात्र याच युवकांना रोजगार कुठे मिळेल किंवा काय सत्य आहे असत्य आहे याबाबत कोणीही सांगणार नाही. त्यामुळे सध्याच्या युगात जास्तीचे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे दिसत आहे.