बारामती(प्रतिनिधी): लाख मेले तरी चालतील, लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. असाच प्रकार बारामती येथील काळे प्रेस्टिजने केलेल्या 60 गाळेधारकांची केलेल्या फसवणूकी विरोधात गणेश चव्हाण यांनी प्रशासकीय भवनासमोर केलेल्या उपोषणाला यश आले असुन, बिल्डर नितीन मारूतीराव काळे, सुनिल दत्तात्रय मदने या दोघांवर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम 420, 406,467,506,34 व महानगरपालिका अधिनियम, 1988 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपब्लिकन सेना राजकीय पक्षाचे पुणे जिल्हा युवकाध्यक्ष गणेश मारूती चव्हाण व बारामती शहराध्यक्षा सौ.रूक्मिणी गणेश चव्हाण हे आहेत. या उपोषणाला रिपब्लिकन सेना राजकीय पक्षाची मोलाची साथ मिळाली असल्याचे इतर गाळेधारकांनी बोलताना सांगितली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, उपोषणकर्ते गणेश चव्हाण यांचा प्रिन्स रेडीमेड गारमेन्ट या नावाने कापड व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी दुकानाची आवश्यकता भासल्याने एस.टी.स्टँड जवळ काळे प्रेस्टिज या इमारतीमध्ये व्यवसायीक गाळे विक्रीस असल्याची माहिती त्यांना मिळाली. काळे प्रेस्टिजचे ऑफिस असलेले इंदापूर रोड वरील जी.एम.देशपांडे कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड समोर गेले असता, त्याठिकाणी नितीन मारूतीराव काळे भेटले. त्यांनी त्यांची ओळख सांगून इमारत स्वत:ची असल्याचे सांगितले. इमारतीबाबत खुलासा करताना त्यांनी सांगितले की, इमारत माझीच आहे मात्र अनेक साईट सुरू असल्याने आयकर जास्त जातो त्यामुळे सदरची साईट मे.संजीवनी असोसिएटस्चे प्रोप्रा सुनिल दत्तात्रय मदने यांचे नावे केली असल्याचे सांगितले. ते सुद्धा सदर ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा सदरची साईट नितीन काळे यांचीच असल्याचे सांगितले.
तद्नंतर काळे आणि मदने या दोघांनी इमारतीचा आराखडा दाखविला. सदरची इमारत सन 2015 पर्यंत पूर्ण करून ताबा देण्यात येईल असे सांगितले. गणेश चव्हाण यांनी या इमारतीतील गाळा नं.201 रक्कम रूपये 14 लाख 50 हजार रूपये किंमतीत खरेदी करणेबाबत दोघांशी चर्चा केली. दि.26 डिसेंबर 2013 रोजी रक्कम रूपये 1 हजार भरून गाळा बुक केला.
काळे व मदने यांचे सांगणेवरून रक्कम रूपये 13 लाख 50 हजार रोख स्वरूपात रक्कम दिली. इमारतीचे काम अपूर्ण असल्याने बांधकाम पूर्ण करण्यासाठी चव्हाण सतत या दोघांच्या मागे तगादा लावीत होते. अद्याप गाळे बुक झाले नाही त्यामुळे काम पूर्ण करण्यास अडचण येत आहे असे सांगितले. या दोघांनी चव्हाण यांना आणखीन एक गाळा घेणेबाबत विनंती केली व सदरचा गाळा नं.201 लवकरात लवकर पूर्ण करून ताब्यात देणेबाबत त्यांनी दिलेल्या आश्र्वासनावर विश्र्वास ठेवून गाळा नं.29 रक्कम रूपये 15 लाख 50 हजार रूपयांमध्ये घेण्याचे ठरविले. चव्हाण यांचा कापड व्यवसाय भाड्याच्या दुकानात सुरू होता. गाळा नं.201 पूर्ण होण्यासाठी चव्हाण हे सतत काळे व मदने यांच्या मागे तगादा लावीत होते. हे दोघे गाळा नं.29 चे रक्कमेबाबत मागणी करीत होते.
इमारतीचे काम पूर्ण नाही चव्हाण यांची आर्थिक अडचण असल्याने काळे आणि मदने यांना गोड बोलत दि.16 एप्रिल 2019 रोजी नितीन काळे यांच्या सांगणेवरून सुनिल मदने यांनी ठरलेल्या किंमतीत गाळा नं.201 चे खरेदीखत करून दिले. गाळा नं.29 याची ठरलेली रक्कम घेऊन दि.28 सप्टेंबर 2022 रोजी खरेदीखत करून दिले. आजतगायत या तीन मजली इमारतीचे काम अपूर्ण आहे व निकृष्ठ दर्जाचे आहे.
या दोघांनी बांधकाम पूर्ण नसताना आर्किटेक्चर यांच्या पत्राचा गैरवापर करीत दि.16 एप्रिल 2021 रोजी गाळा नं.201 व दि.29 सप्टेंबर 2022 रोजी गाळा नं.29 चे बेकायदेशीर खरेदीखत करून दिले. महाराष्ट्र बँकेचे सदर इमारतीवर या दोघांनी कर्ज काढले आहे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी सुद्धा या दोघांनी घेतली होती सध्या 8 कोटी रूपयांचे कर्ज झाले आहे. सदर कर्जाची वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकारी व बारामतीचे तहसिलदार यांनी जप्तीचे आदेश काढलेले आहेत. याबाबत या दोघांना जाब विचारला असता, तुम्हाला खरेदीखत करून दिले आहे तुमचा आमचा संबंध संपला. बँक आणि तुम्ही बघून घ्या असे सांगून पुन्हा आमच्याकडे आला तर हाकनाक जीवाला मुकशील अशी धमकी दिली. इतर गाळेधारकांची माहिती घेतली असता त्यांची सुद्धा घोर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
आजतगायत नगरपरिषदेचे पूर्णत्वाचा दाखला दिला नाही. इमारत आर्किटेक डिझाईन प्रमाणे केली नाही. सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले. फायर कनेक्शन दिले नाही. त्यामुळे गाळेधारकांच्या जीवाला धोका उत्पन्न झालेला आहे. पार्किंग सुरू नाही. फ्लेवर ब्लॉक बसविलेला नाही. टेरेसवर वॉटर प्रुफींग केले नाही. कॅप्सुल लिफ्ट बसविली नाही, साधी लिफ्ट बसविण्याच्या तयारीत आहे. लाईट मीटर बसविण्यासाठी 25 हजार रूपये घेतले खरेदी करताना पुन्हा जबरदस्तीने 12 हजार 700 रूपये जास्तीचे हडपले. बारामती नगरपरिषद, महाराष्ट्र बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. काही दिवसापूर्वी दोन मजली बांधकामाची परवानगी मिळाली आहे. परंतु हे बांधकाम हे जुने आहे व निष्कृत दरजेचे आहे आणि यावरही दोन मजली बांधकाम केले तर आमच्या जिवाला व येणारे जाणारे लोकांना जिवाला धोका आहे.
चव्हाणसह सर्व गाळेधारकांची आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. व्यवसायाचे नुकसान झाले आहे. काम पूर्ण न झाल्याने सदरचे गाळे विकता येत नाही किंवा भाड्याने सुद्धा देता येत नाही. काळे व मदने यांनी चव्हाण सह सर्व गाळेधारकांची प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. सर्व गाळेधारकांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेतला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.