मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ राहिलं नाही तरी, काही फरक पडत नाही चिन्हांपेक्षा पवार साहेबांचे विचार महत्वाचे असल्याचे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा समोर आला आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी (26 जुलै ) शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असे मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजूंचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल. पण, निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयात जात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणते चिन्ह मिळाले पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणार्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार, याचा अंदाज आला आहे, असेही रोहित पवार म्हटले. पवार साहेबांच्याबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, असेही ते म्हणाले.