इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): संत सावतामाळी मंदिर परिसरात अनेक विकासकामे केली असून उर्वरित विकासकामांसाठी सुद्धा लवकरच तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 25 लाख रूपये निधी देणार असल्याचे वक्तव्य माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी केले.
निमगाव केतकी ता.इंदापूर येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री.भरणे बोलत होते. यावेळी संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले.
या प्रसंगी जि.प. माजी सभापती प्रविण माने, इंदापूर पं.स. माजी सभापती अंकुश जाधव, सचिन सपकळ, सरपंच प्रविण डोंगरे, पांडुरंग हेगडे, रतन हेगडे, तात्यासाहेब वडापूरे, बबन खराडे, संदिप भोंग, सचिन राऊत, संतोष राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे श्री.भरणे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला साधू-संतांचा खूप मोठा अध्यात्मिक वारसा लाभला असून संत-महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला असल्याचे सांगत या ठिकाणी गेल्या 33 वर्षांपासून निमगावकरांनी अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवल्या बद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.