बारामती(वार्ताहर): संपूर्ण राज्यातील पालकांना आपला पाल्य बारामतीत शिकावा असे वाटत असते, मात्र याला कसलेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
बारामतीतील कोचींग क्लासेस चालकांच्या बैठकीत श्री.इंगळे बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे उपस्थित होते.
पुढे इंगळे म्हणाले की, कोणतीही मदत हवी असेल तर 112 या क्रमांकावर फोन करा. काही मिनिटातच पोलिस तुमच्या मदतीला पोचतील याची खात्री त्यांनी यावेळी दिली. बारामती शिक्षणाचे हब झाल्याने शिक्षण घेणार्यांची संख्या वाढत आहे. चुकीची घटना या सगळ्यावर पाणी फिरवू शकते, त्यामुळे सर्व कोचींग क्लासेस चालकांनी जबाबदारी आहे व सदैव सतर्क राहण्याची गरज आहे.
लॉज, हॉटेलची तपासणी, शैक्षणिक संस्था त्यांचे हॉस्टेल यांच्या लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमण्यात आलेले आहे. मध्यंतरी कॅफेची तपासणी केली. आतमध्ये कोण बसले आहे, हे बाहेरून दिसावे अशाप्रकारची व्यवस्था या कॅफे चालकांना पोलिसांनी करायला लावली आहे.
कोचिंग क्लासेस चालकांनी सुरक्षारक्षकांची सर्व माहिती पोलिसांना द्यावी. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांचे चालक, वसतीगृहातील कर्मचारी व त्यांची निवड पोलीसांची मदतीने काळजीपूर्वक करावी. संस्थेच्या परिसरात सीसीटिव्ही लावावेत, 7 दिवसांचा डेटा स्टोअर राहील अशी यंत्रणा असली पाहिजे. महिला कर्मचारी काम करत असल्यास संस्थेअंतर्गत लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीची समिती नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. पॉस्को ऍक्टनूसार 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलीचा लैंगिक छळ झाला आणि त्याची माहिती जर दिली गेली नाही तर माहिती दडपणार्यावरही अजामिनपात्र गुन्हा दाखल होतो. यामुळे याबाबतही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
कोचींग क्लासेससाठी घरपट्टीची आकारणी ही व्यावसायिक म्हणून होते. आपल्या क्लासच्या जागेची खात्री करावी. वीजजोडण्या सुरक्षित आहे का तसेच अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे असल्याचे महेश रोकडे यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर मोरे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन जर पोलिसांनी केले तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल, यासाठी आवश्यक असेल ते सहकार्य क्लासेस चालक करतील असे यावेळी प्रा.गौरव गुंदेचा यांनी सांगितले.
पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने आपल्यापर्यंत येऊन ही माहिती दिली. आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. बारामतीतील शैक्षणिक वातावरण चांगले असावे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी प्रा. शेषराव काळे केले.