सत्ता असो किंवा नसो, बारामतीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कोंडमारा सुरू असल्याचे दिसते. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी तन-मन-धनाने काम केले, विरोध केला, विरोधकांची बोलणी पावलो-पावली सहन केली. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून पक्षासाठी काम केले. वरिष्ठांनी दिलेले आदेशाचे पालन केले. मात्र, आता तर बारामतीचा विकास करणारे विरोधी पक्षनेते सध्याचे उपमुख्यमंत्री आ.अजित पवार हेच आता भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी आणखीन संकटात सापडलेले दिसत आहेत. काहींनी तर काम थांबविण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.
आज केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. तरी सुद्धा बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी काय अवस्था होती व आहे याचा पक्षातील पक्षश्रेष्ठी कधी विचार करणार आहेत की नाही. आज जरी आ.अजित पवार भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी झाले असले तरी भाजपला येथील स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा राष्ट्रवादीच्या ताब्यात असणार्या इतर संस्थेत भाजप पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार का? हा खरा प्रश्र्न आहे.
कित्येक वर्षापासुन पिढ्यान्पिढ्या एकत्र राहिलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होती व आहे. आता या आघाडीत शिवसेनेने उडी घेतल्याने महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. इतक्या वर्ष सख्ख्या भावाप्रमाणे राहिलेला कॉंग्रेस त्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बारामतीत काय अवस्था आहे याचा विचार केला तरी भाजपचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. आजतगायत कॉंग्रेसचा एकही कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असणार्या संस्थेत गेला नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
महाराष्ट्रात शंभरच्यावर आमदार भाजपकडे असताना, छोट्या-छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना आयते कोलित हाती देवून भाजप काय साध्य करणार आहे हे बारामतीतील कार्यकर्ते अनभिज्ञ आहेत. एवढ्या आमदारांनी विरोधकांशी दोन हात पुढे करीत नैतिकता ढळू न देता दंड थोपटत निवडून आले. मात्र, आज त्यांची अवस्था काय आहे याचा विचार झाला पाहिजे. आज सत्तेत सामील झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये खातेवाटपात चढाओढ सुरू झालेली दिसत आहे.
जिल्ह्यात इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र आहे आणि सध्या तो वेगळ्या वळणावर असतानाच राज्यातील राजकीय घडामोडीतून राष्ट्रवादीमधील अजितदादा गटाने भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभाग मिळवला. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार्या भाजप पदाधिकार्यांची राजकीय कुचंबणाच या घडामोडीतून उघड झाली आहे. भाजप आमदार असलेल्या बहुतांशी मतदारसंघात दुसर्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळालेली आहेत तर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बहुतांशी ठिकाणी दुसर्या क्रमांकाची मते भाजपला मिळालेली आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. तेथे त्यांचा व भाजपचा संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे. या संघर्षाची धार तीव्र बनली असतानाच अजितदादा गटाबरोबर कसे जुळवून घ्यायचे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकला आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणारी ही परिस्थिती आहे. अजितदादा गटाशी जुळवून घेण्याचे नवे आव्हान कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाले आहे. मात्र त्याविरुद्ध बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गत भाजप कार्यकर्त्यांची झालेली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल याच्या प्रतिक्षेत काही भाजपचे आमदार असतानाच राजकीय घडामोडीतून नुकत्यच झालेल्या भूकंपातून त्यांची प्रतीक्षा लांबणीवर पडली. यातून भाजपच्या निष्ठावंतांना कोणी वालीच राहीला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडे महाराष्ट्रात मराठा नेता नाही. येणार्या लोकसभेला जास्तीत जास्त खासदार पक्षाचे निवडून आणून पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न उराशी काही नेत्यांनी बांधलेले आहे. मात्र, पक्षाचा कणा कार्यकर्ता व पदाधिकारी असताना तोच या घडामोडीमुळे मोडला आहे त्यामुळे मतदार राजा येणार्या निवडणूकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.