राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये भूकंप झाला. यामध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
एका बाजुला खा.शरद पवार तर दुसर्या बाजुला आ.अजित पवार यांची पत्रकार परिषद या गोंधळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आता काय करायचे? अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली.
बारामतीतील पक्षाचे जे कार्यकर्ते पक्षाच्या विविध सुख-दु:खात पक्षाबरोबर राहिले एकनिष्ठेने काम केले आज त्यांची अवस्था दयनिय आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झालेली आहे. पक्षाच्या नेत्यांवर जे आर्थिक, सामाजिक क्षेत्रात गब्बर झाले आहे त्यांनी आतापर्यंत कोणतीही भूमिका घेतली नाही किंवा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री निवड झालेबद्दल फ्लेक्स बाजी केली नाही. पक्षाच्या वाढीसाठी, उद्धारासाठी विरोधकांशी दोन करणारे किंवा सोशल मिडीया गाजविणारे कार्यकर्ते त्याच विरोधकांनी अजित पवार यांचा लावलेला फ्लेक्स पाहुन त्यांच्यात तळपायाची आग होताना दिसत आहे.
काही कार्यकर्त्यांचे मत पवार साहेब देव आहेत त्यांनी तळागाळातील लोकांना कार्यकर्त्यांना मदत केली त्यांच्या भावना जाणून घेतल्या कित्येकाचे कल्याण केले. संयमाने त्यांचे प्रश्र्न ऐकुण घेतले त्यावर मार्ग काढला. सर्वधर्म समभावाची वागणूक दिली व ती कृतीत उतरविली सुद्धा. आजही ती जुणी मंडळी विसरत नाही. मात्र, अजित पवार यांनी आमच्याच जमिनींवर आरक्षण टाकले त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांची कधीही जाणीव ठेवली नाही. प्रत्येक निवडणूकीत आर्थिक गडगंज असणार्या लोकांना पदे दिली तीच पदे घेणारी पाच वर्षाने पुन्हा पक्षाचे तोंड सुद्धा पाहिले नाही. पदे देताना जातीवाद केला अशी खोचक प्रतिक्रीया दबक्या आवाजात व्यक्त करीत आहेत.
गद्दार, बंडखोर, फुटीरवाद, 50 खोके एकदम ओके अशा वाक्यांना पुन्हा उजाळा मिळाला. हा वाद कितपत खरा आहे हे सुद्धा काही कार्यकर्ते उघड बोलताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांसह काही आमदार अपात्र ठरणार आहेत त्यामुळे पवार साहेबांनीच आ.अजित पवार यांना शपथ घेण्यास सांगितले असेही बोलले जात आहे. दि.5 जुलै रोजी झालेल्या एकमेकांच्या बैठकीतून पडलेली ठिणगी रौद्ररूप धारण केल्याशिवाय राहणार नाही असे दिसत आहे.
पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते असे आहेत की, आ.अजित पवार यांच्या खुप निकटवर्ती आहेत मात्र, यांचे पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे त्यामुळे अशा कार्यकर्ते व पदाधिकार्यांची द्विधा परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ते आजही म्हणत आहेत वेट ऍण्ड वॉच!
काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांचे वय झाले आहे. त्यांनी येणार्या काळात पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे सर्व सुत्रे युवकांच्या हाती द्यावी. शिवसेना पक्षात फुट पडली त्यामध्ये ठाकरे कुटुंबियातील कोण बाजुला झाले नाही जे शिवसेनेवर मोठे झाले त्यांनी दगाबाजी केली. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात तसे नाही पक्षाला स्वकीयांनीच दगा दिला असे झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेले आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पक्षफुटीची वेळ येते तेव्हा याच नेत्यांना कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आठवण येते. ज्यावेळी लाखो, करोडो रूपये पक्षाला पक्षनिधी म्हणून येतात किंवा आणले जातात त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ते व पदाधिकार्यांची त्यावेळी आठवण का येत नाही. म्हणजे पक्ष बुडायला लागला की नेता म्हणतो हात दे, सर्वसामान्य कार्यकर्ता व पदाधिकारी बुडायला लागला की हात देणे तर दूरच लगेच तो आमचा कार्यकर्ता नव्हेच त्याने दोन महिन्यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे असे म्हणून कातडी बचाव कार्यक्रम करायचा त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आता काय करायचे याचा विचार करूनच पक्ष, नेते निवडावे अन्यथा स्वत:चे कुटुंबाचे मेहनत करून उज्वल करावे एवढीच अपेक्षा.