बारामती(वार्ताहर):
दिंड्या पताका घेऊन निघाले।।
वैष्णव पंढरपुरी।।
पांडुरंग भेटीचे आस मनात।।
निघाली म.ए.सो.ची वारी।।
विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नावाचा जयघोष करीत म.ए.सो. पूर्व प्राथमिक विभागातील बाल वारकर्यांनी आषाढी वारी उत्सव साजरा केला. आषाढ वारीचा विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा म्हणून शाळेत बुधवार 23 जून 2023 रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाल वैष्णवांनी पारंपरिक वेश परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात शाळेचे वातावरण पंढरीमय झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांच्या हस्ते पालखीचे पूजा करून शुभारंभ झाला.
विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर, सोपान देव निवृत्तीनाथ, मुक्ताई, तुकारामांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण होते. मोठ्या गटातील मुलांनी चांगदेवाचे गर्वहरण हे नाटुकले उत्तम रित्या सादर केले. त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या मुली आणि टाळ वाजवत उड्या मारणार्या मुलांनी विठोबा रुक्माई च्या घोषात अश्वरिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि सर्व बाल वारकर्यांची पालखी घेऊन मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये पालकांनी देखील सहभाग घेतला होता. बुधवार दि.21 जून 2023 रोजी बारामती नगरीमध्ये संतश्रेष्ठ सोपानदेव महाराजांच्या पालखींचे आगमन झाले होते या निमित्ताने आपल्या बालमित्रांनी मे महिन्यातील सुट्टीत दिलेल्या उपक्रमानुसार मुलांनी स्वतः तयार केलेले सीड्स बॉल वारकर्यांना देऊन त्याची माहिती सांगून पर्यावरणाविषयी जनजागृती केली. हे या सोहळ्याचे खास आकर्षण होते. टाळ मृदंगाच्या तालावर अखंड विठ्ठल नामाचा जयघोष करीत मुलींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, फुगडी खेळत विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि पालखी सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास शाळेच्या शाला समितीच्या सर्व पदाधिकार्यांचे बहुमोल मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या व सर्व बालमित्रांचे कौतुकही केले.