बारामती(वार्ताहर): येथील समीर वर्ल्ड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बारामती शहरातील बहुसंख्य शाळा, महाविद्यालयात योग दिन समारंभाला चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये समीर वर्ल्ड स्कूलसुद्धा मागे राहिले नाही.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयातील मैदानावर योगाचे प्रात्यक्षिक केले.
’शरीर हीच संपत्ती’ यानुसार सर्वांगीण विकासात शारीरिक शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास व्हावा, यासाठी समीर वर्ल्ड स्कुल शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवित आलेले आहे.
मुलांना अनुभव घेऊ देणे हाच मुख्य उद्देश ठेवून स्कूल उपक्रम राबवीत असते. कारण प्रत्येक माणूस स्वत:च्या अनुभवातूनच शिकत असतो.
कृतीयुक्त व आनंददायी अध्यापन स्कूलमध्ये होत असल्याने शाळेची ओळख ’एक उपक्रमशील’ स्कूल म्हणून होऊ लागली आहे. या सगळ्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत असल्यामुळे स्कूल आज प्रगतीपथावर आहे.
योग दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुहास भोसले, सुभाष सानप उपस्थित होते. या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून मोलाचे विचार दिले. सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.