बारामती(वार्ताहर): सामान्य नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी अशा मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्याचे शुभम गायकवाड यांनी बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांना दिले आले.
अन्यायग्रस्त, दु:खी, पिडीत, कायद्याचे अपूर्ण ज्ञाना अभावी काही लोकं वरील मंडळींच्याकडे न्याय मागण्यासाठी येत असतात. या पिडीताला न्याय मिळावा म्हणून वरील मंडळी पोलीस स्टेशनसह इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयात जातात. त्याठिकाणी या मंडळींना सन्मानाची वागणूक मिळत नाही असे कित्येक वेळा निदर्शनास आले आहे. पीडित व्यक्ती व पोलीस यांच्यातील दुवा म्हणून सदरील मंडळी काम करत असतात.
पिडीतांचे काम करणार्यांना संबंधित शासकीय कार्यालयातून अपमानीत केले जात असेल तर ही खूप खेदाची बाब आहे. त्यामुळे या मंडळींना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश बारामती तालुक्यातील व बारामती शहर पोलीस स्टेशनला देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.
अन्यायग्रस्ताला पोलिसांशिवाय इतर कोणाचा आधार नसतो. पोलीसांबाबत नागरिकांमध्ये एक आदर व सन्मानाची जागा असते. व्यथा मांडण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यास पोलीसांकडून योग्य ती मदत मिळाल्यास पोलीस त्या व्यक्तीच्या व नागरीकांच्या मनातून आदरभाव व्यक्त होत असतो.
सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिले.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, सरचिटणीस गणेश थोरात, बारामती तालुका महिला अध्यक्ष वंदना गायकवाड, बारामती शहराध्यक्ष निखील भाई खरात, बारामती शहर संघटक समीर खान, सदस्य नितीन (दादा)गायकवाड,अरुण मोरे उपस्थित होते.