हॅपी स्ट्रीटसमुळे बारामतीकर डिजीटल गॅजेट्‌सपासुन दूर राहिले : एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): बारामतीकरांना डिजीटल गॅजेट्‌स पासुन दूर ठेवणे आणि तणावमुक्त उपक्रमांसह सकाळचा आनंद घेणे हा मुख्य उद्देश ठेवत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने आयोजित हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाला बारामतीकारांनी भरभरून प्रतिसाद दिला व विविध खेळांचा आनंद लुटला.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने रविवारी (ता.18) बारामतीत हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजल्यापासून पुढे तीन तास आबालवृध्दांनी आपले वय व हुद्दा विसरून अनेक खेळांचा आनंद लुटला. लहान मुलांसोबतच मोठ्यांनी देखील हॅपी स्ट्रीट अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत रविवारची सकाळ अविस्मरणीय केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक खेळाच्या ठिकाणी जाऊन बारकाईने माहिती घेतली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने बारामतीत सुरू असलेले काम हे प्रशंसनीय असून या पुढील काळात फोरमच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावे आणि या कामाची व्याप्ती अधिक वाढवावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली. बारामती शहर सर्वांग सुंदर करताना नागरिकांना खर्‍या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून सफल झाला असे अजित पवार म्हणाले.

वारली पेंटिंग, स्केचिंग, टॅटू काढणे, फेस पेंटिंग, पोट्रेट काढणे याचाही नागरिकांनी आनंद लुटला. या ठिकाणी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या तर योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व नागरिकांना समजून सांगितले. नितिन दोशी, नंदू व सरिता डेव्हीड, आकाश जाधव, जॉनी नवगिरे, अनिल केसकर, सचिन सस्ते, गणेश हिंगणे, ऍड.प्रभाकर बर्डे, डॉ. रेवती संत, सिध्दी पवार, सागर गोरे यांनी जुनी नवीन लाईव्ह गाणी सादर केली.

या उपक्रमाचा शेवट झुंबा नृत्याने झाला. या नृत्यांमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी दीड दोन तास विविध गाण्यांवर ठेका धरत या नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.

कोणी सापशिडी, गोट्या, लुडो, धनुष्यबाण, दोरीवरच्या उड्या, तर काही जण आरोग्याच्या टिप्स घेत होते. तर काही वडापाव भज्यांवर ताव मारत होते. बहुसंख्य लोक संगीताच्या तालावर मनसोक्त नृत्य करीत होते.

विद्या कॉर्नर ते गदिमा हा रस्ता अजित पवार यांनी सुशोभित केल्यानंतर या रस्त्याच्या माध्यमातून बारामतीकरांना विविध खेळांच्या माध्यमातून वेगळा आनंद मिळावा या उद्देशाने हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाचे आयोजन केल्याचे फोरमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस, नागरिकांनी मन प्रसन्न होणारे खेळ खेळावेत व नृत्याचा आनंद घ्यावा, त्यांना चार घटका विरंगुळा मिळावा, अशी या मागची संकल्पना असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!