रयतेवर जिवापाड प्रेम करणारे हिंदवी स्वराज्य रक्षक, अखंड हिंदूस्थानाचे अराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानी-मनी सुद्धा भय हा शब्द नव्हता. काल तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. अशा थोर महानपुरूषाची जयंती एकवेळा नव्हे तर संपूर्ण बारा महिने साजरी झाली पाहिजे. मात्र, जयंतीनिमित्त जो मंडळांनी डी.जे. लावला होता त्यामुळे रयतेमध्ये भय निर्माण झाले होते. ज्या महाराजांनी भय शब्द पुसून टाकला होता तो आताच्या माहिती तंत्रज्ञान युगातील मावळ्यांनी रयतेमध्ये भय शब्द प्रचलित केला ही खूप मोठी शोकांतिका आहे.
जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळी खरं डी.जे असता तर स्वराज्याच्या शत्रूंना रोखणे सोपे झाले असते. मोठ-मोठ्याने डीजे लावून त्यांचे हृदय, कान बंद केले असते आणि सहज आपण चढाई करून संपूर्ण शत्रूचा नायनाट केला असता. हृदयाचा ठोका चुकविणार्या डिजेचा गगनभेदी आवाज याच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास तुमच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते हा तज्ञांचे म्हणणे आहे. शिवजयंतीत मात्र आवाज ऐकून ज्या मंडळांनी खरंच देखावे करून महाराजांचे उच्च विचार तळागाळापर्यंत रूजावे ते आत्मसात करावे हा विचार व देखावे धुळीस मिळाले म्हटलं तर वावगे ठरू नये. कारण डिजेच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरीक पाठफिरवू घरचा रस्ता त्याने धरला.
महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय करता येईल याचे उच्च विचार त्यांच्याकडे होते. स्वराज्याचा विस्तार कसा केला जाईल याचा ते सदैव विचार करीत असे. सध्याचे मावळे पुढच्या वर्षी माझा डिजे समोरच्या डिजेपेक्षा आणखीन किती मोठ्याने वाजेल याकडे जास्तीचे लक्ष आहे. महाराजांनी बांधलेले गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागत असे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जायचे. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत पाहिला पाहिजे होता. आजचा मावळा डिजे वाजताना आडवे-तिडवे नाचणार्याच्या अंगावर पडला नाही पाहिजे. समोरचा डिजे लावणारे मंडळ हेच खरे शत्रू आहेत असे समजून मावळ्यांच्या तोंडात जल (मद्य) डोक्यात डिजेची (धुंदी) अशी लाजीरवाणी कृती करून डिजेचा आवाज वाढवीत होते.
गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. त्यांनी या गनिमी काव्यामुळे शत्रू कितीही संख्येने असले तरी त्यांचा पाडाव केला. यामुळे महाराजांनी गड जिंकले व उभारले. त्यांच्याकडे 400 हून अधिक गडकिल्ले होते. सध्याचा मावळा मात्र कोणाला किती पाजायची आणि आपल्या शत्रूवर सोडून देवून स्वत: स्वार्थ कसा साधायचा याचा गनिमी कावा चांगला अवगत केलेला आहे. त्यामुळे समोरच्या शत्रूकडे कितीही मावळे जास्तीच्या संख्येने असले तरी काहीही फरक पडत नाही कारण ज्याला स्वार्थासाठी, राजकारणासाठी किंवा समाजात पत वाढविण्यासाठी ज्याचा उपयोग केला तो प्रचलित कायद्याचा वापर करून त्यास ठार करीत आहे. समाजात त्यास शून्य किंमत निर्माण करीत आहेत. एकमेकांमध्ये म्हणजे राजकीय, सामाजिक इ. क्षेत्रात द्वेष निर्माण करायचा आणि स्वत:ची पोळी भाजून घ्यायची हे एकमेव षडयंत्र सध्या सुरू आहे.
महाराज हिंदू असूनही मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. त्यांचे सतत म्हणणे असायचे आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे. त्यांनी स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणार्यांना कठोर शिक्षा केली. मात्र सध्याचे मावळे स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी मुस्लिमांना त्रास देत आहेत त्यांच्या धर्माला ठेस पोहवत आहेत. स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणार्यांना मंत्रीमंडळापासून ते गावपातळीपर्यंत मोठ-मोठी पदे दिले जातात ही खूप मोठी भयाची गोष्ट आहे त्यामुळे महाराजांनी भय हा शब्द पुसून टाकला खरा या सध्याच्या मावळ्यांनी तो पुन्हा रयतेच्या मना-मनामध्ये टाकला आहे. महाराज आता असते तर भयमुक्त वातावरण निर्माण केले असते व गैरकृत्य करणार्या मावळ्यांना गडावरून ढकलून दिले असते मग वाजला नसता डिजे आणि रयत झाली असती भयमुक्त! एवढं मात्र नक्की…