इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके) : विशाखापट्टनम येथुन पुणे येथे विक्रीस नेत असलेला 240 किलो गांजा इंदापूर पोलीसांनी सापळा रचून जप्त केला. गांजा वाहुन घेऊन जाणारे बारामतीच्या दोघांना अटक केली असल्याचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली.

इंदापूर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार एक क्रेटा कार गांजा घेऊन जात असल्याची खबर मिळाली. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व यांच्या पथकाने 9 फेब्रुवारी 2023 रोजी रात्रौ.8 वाजता सरडेवाडी टोल नाका येथे पुणेकडे भरधाव वेगाने जाणार्या हुंदाई कंपनीच्या क्रेटा (एच42 एआर 5656) कारमध्ये 240 किलो गांजा सापडून आला.
रूपेश दिलीप जाधव (रा.वृंदावन पार्क, कसबा, ता. बारामती) आणि सुनिल तुळशीदास वेदपाठक (मळद रोड, देवळे पार्क बारामती ता. बारामती जि.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये गुगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985चे कलम 8(क), 20(ब),20 (2) (क), 29 भादवि क 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या कारला पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, या दोघांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. पोलीसांनी या कारची डिक्की उघडून पाहिली असता डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले 120 पॅकेट आढळून आले. कॅनावियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा असा 60 लाख रूपये किंमतीचा 240 किलो ओलसर गांजा मिळून आला व 10 लाख 20 हजार रूपये किंमतीची कार असा तब्बल 70 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरचा गांजा कोठून खरेदी केला. कोणाला विक्री करण्यास चालविला होता याबाबत या दोघांकडून माहिती घेण्यात येणार असल्याचेही श्री.भोईटे यांनी यावेळी सांगितले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवालदार श्री.बालगुडे, पोलीस शिपाई लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, शिधाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे, विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.